अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक टाकले ओहळाच्या पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:55 IST2018-03-10T05:55:52+5:302018-03-10T05:55:52+5:30

अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक टाकले ओहळाच्या पाण्यात
बोईसर - नुकत्याच जन्मलेल्या नवजात अर्भकालाचे मृतदेह येथील वाणीपाडा ते चंद्रनगर कडे जाणाºया रस्त्यावरील अंधेरी ओहळामध्ये सापडला आहे. अनैतिक संबधातून जन्मलेल्या या अर्भकाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या संदर्भामध्ये बोईसर पोलीस कसून चौकशी करीत आहेत. सोमवारी पोलिसांना या घटनेची माहिती ग्रामस्थांकडून मिळताच पाण्यांत टाकलेले अर्भक ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्या अर्भकाच्या बेंबीला नाळ तशीच होती. म्हणजे अपत्य जन्मल्याचे लपवून ठेवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने त्यांनी तपास सुरू केला असून भादवि कलम ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरिकांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली आहे. तसेच बाहेरील कुणी अज्ञात व्यक्ती येऊन सदर अर्भक टाकून गेले असेल का त्याही दिशेनेही पोलीस शोध घेत असल्याचे बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी सांगितले