वाढवणमुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:58 IST2025-07-17T09:58:17+5:302025-07-17T09:58:45+5:30
वाढवण बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल.

वाढवणमुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल : मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे, तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने आयोजित सागरी शिखर परिषद २०२५चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, परिवहन व बंदरे विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष उमेश वाघ आदी उपस्थित होते.
वाढवण बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. भारताचे पहिले ‘ऑफशोअर विमानतळ’ वाढवण बंदराशेजारी उभारले जात आहे. यामुळे जलमार्ग, रेल्वे, रस्ता आणि हवाई मार्गांची मल्टिमोडल जोडणी मिळेल.
राज्यासाठी एक मजबूत मेरीटाइम व्हिजनचे ध्येय
फडणवीस म्हणाले की, भविष्यात भारत हा जागतिक सप्लाय चेनमधला महत्त्वाचा भागीदार बनू शकतो. म्हणूनच केंद्र सरकारने ‘इंडिया मेरीटाइम व्हिजन २०३०’ आणि ‘अमृतकाल मेरीटाइम व्हिजन २०४७’ तयार केले आहे. या दोन्ही व्हिजनचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी एक मजबूत मेरीटाइम व्हिजन तयार करण्याचे आपले उद्दिष्ट आहे. या धोरणासाठी आजच्या चर्चासत्रातील सर्व शिफारशी संकलित करून आम्ही त्या अमलात आणू. यासाठी सागरमाला प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.