अफगाणिस्तानच्या फायटर्सवर भारतातले फायटर्स ठरले भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:58 IST2020-01-03T23:58:31+5:302020-01-03T23:58:49+5:30
पालघर फायटिंग लीग उत्साहात; नियोजनबद्ध आयोजनाचे सर्वांनी केले कौतुक

अफगाणिस्तानच्या फायटर्सवर भारतातले फायटर्स ठरले भारी
पालघर : पालघर जिल्ह्यात अलीकडेच आयोजिण्यात आलेली ‘पालघर फायटिंग लीग’ उत्साहात पार पडली. वेगवेगळ्या राज्यातील व देश-विदेशातील फायटर्सनी आधीच या लीगला पसंती दाखवली होती. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामने या लीगचे विशेष आकर्षण होते. पालघर फायटिंग लीगचे व फिटनेस फॅक्टरीचे संस्थापक विवेक उपाध्याय यांच्या तालमीत तयार झालेले भारताचे फायटर अफगाणिस्तानच्या व्यावसायिक फायटर्सवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. फिटनेसबद्दल जागरूकता, दोन नवीन खेळांमध्ये करियरची संधी, व्यसनमुक्त पालघर व महिलांसाठी सेल्फ डिफेन्स हे सर्व मुद्दे घेऊन सुरुवात केलेल्या पालघर फायटिंग कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद जनतेने दिला, असे पालघर फायटिंग लीगच्या ट्रेझरर सिम्मी सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.
भारत व अफगाणिस्तानच्या लढतीत अविनाश पांडे, वैभव देवरे, मुकुल कश्यप व मणियार मजहर खान यांनी आपल्या लढती जिद्दीने जिंकून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. तसेच अॅलेक्स हरिजन व एंजल पाटील यांनी चिकाटी दाखवून चांगली लढत दिली. लढती गमावून सुद्धा त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्टेडियममधील उपस्थितांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळाला.
वेगवेगळ्या देशातून व राज्यातील आलेल्या कोचेस व फायटर्सनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारचे नियोजनबद्ध व भव्य आयोजन भारतातच प्रथम पाहायला मिळाले आहे. असेच आयोजन जर होत राहिले तर ग्रापलिंग व एमएमए या खेळाची लोकप्रियता भारतात लवकर वाढून देश-विदेशात खेळण्याच्या संधी लवकरच सर्वांना उपलब्ध होतील.
सेल्फ डिफेन्ससाठी टीम सज्ज
या लीगच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ समूहाचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी उपस्थिती दाखवली होती. त्यांचे स्वागत करून पीएफएलचे व्यवस्थापकीय संचालक यतीन पाटील यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम व लिग्स मुंबई व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी ‘लोकमत’सोबत आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
पीएफएलच्या टीमने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाले असून त्याचे उद्दिष्टही साध्य होताना दिसत आहे. अशा प्रकारच्या अकॅडमीज काढून जास्तीत जास्त फायटर्स भारतासाठी तयार करण्यासाठी व मोठ्या प्रमाणात मोफत सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यासाठी टीम पीएफएल सज्ज आहे, असे यतीन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.