पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला १५ वर्षांनंतर अटक, उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:20 IST2025-01-27T17:20:01+5:302025-01-27T17:20:24+5:30
पत्नी रिहाना रात्री गाढ झोपलेली असताना आरोपी पती जवादने तिच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे ठार मारले होते. महंमद याच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी २५ मे २०११ रोजी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी पती फरार होता...

पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला १५ वर्षांनंतर अटक, उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे पोलिसांच्या जाळ्यात
मंगेश कराळे -
नालासोपारा : पत्नीची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपी पतीला तब्बल १५ वर्षाने उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी आणि सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे.
संतोष भवनच्या बावशेत पाडा येथील तुळशी नगरमधील द्वारका चाळीत, रिहाना (३५) ही दुसरा नवरा जवाद सय्यदसह पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा व दोन मुलींसह राहत होती. मुलगा महंमद खान हा गाळा नगरच्या जरीच्या कारखान्यात काम करत तिथेच मित्रांसह राहत होता. तो अधूनमधून दोन्ही बहिणी व आईला भेटण्यासाठी घरी यायचा. याच कारणावरून सावत्र वडील जवादला राग यायचा व त्यामुळे रिहाना सोबत भांडणे व्हायची. २२ मे २०११ रोजी महंमदने आई व बहिणीसोबत घरी मुक्काम केला होता. याच कारणावरून २४ मेच्या रात्री पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाले. पत्नी रिहाना रात्री गाढ झोपलेली असताना आरोपी पती जवादने तिच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे ठार मारले होते. महंमद याच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी २५ मे २०११ रोजी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी पती फरार होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश केले होते. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने फरार आरोपीचा यापूर्वी सर्वोतोपरी शोध घेऊन देखील तो गेल्या १५ वर्षापासुन मिळुन येत नव्हते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सपोनि दत्तात्रय सरक, सफौज आसिफ मुल्ला, पोहवा. संग्राम गायकवाड, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सूर्यवंशी असे तपास पथक तयार केले होते.
या पथकाने गुन्ह्याची माहिती घेऊन गेल्या १ महिन्यांपासून सतत अहोरात्र मेहनत घेवून तपासात सातत्य ठेवून आरोपीची माहीती घेतली. आरोपी हा त्याचे मूळ गावी असल्याचे कळले. या पोलीस पथकाने आरोपीच्या मुळ गावी जावुन बातमीदार व आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रीक विश्लेषणावरून तो त्याचे गांवातील घरात राहत असल्याची माहिती मिळाली. लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने सापळा लावुन आरोपी जवाद सय्यद (३१) याला २५ जानेवारीला शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला लखनऊच्या न्यायालयात हजर करून २८ जानेवारीपर्यंत ट्रान्झिट रिमांड घेतली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो.निरी. अविराज कुराडे, सपोनिरी. दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, सहापोउपनिरी. श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोहवा. शिवाजी पाटील, महेश वेल्हे, हनुमंत सुर्यवंशी, राजाराम काळे, संतोष मदने, संग्रामसिंग गायकवाड, प्रविणराज पवार, गोविंद केंद्रे, साकेत माघाडे, नितीन राठोड, अंगद मुळे, आकील सुतार, मसुब सचिन चौधरी, सफौ. संतोष चव्हाण यांनी केली आहे.