हंटरने फोडले, दरीत ढकलायची धमकी दिली तरी तोंड नाही उघडले
By Admin | Updated: August 14, 2015 23:08 IST2015-08-14T23:08:42+5:302015-08-14T23:08:42+5:30
ब्रिटीशाविरोधातील ‘‘करेंगे या मरेंगे’’ या चळवळीचा विचार सर्वसामान्यांमध्ये पोहचविण्यात व ही चळवळ अधिक प्रखर बनविण्यासाठी छापील पत्रके वाटप करताना सातपाटी मधील

हंटरने फोडले, दरीत ढकलायची धमकी दिली तरी तोंड नाही उघडले
- स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ नाईक
ब्रिटीशाविरोधातील ‘‘करेंगे या मरेंगे’’ या चळवळीचा विचार सर्वसामान्यांमध्ये पोहचविण्यात व ही चळवळ अधिक प्रखर बनविण्यासाठी छापील पत्रके वाटप करताना सातपाटी मधील चौदावषीय स्वातंत्रसैनिक जगन्नाथ गोविंद नाईक यांच्यासह त्यांच्या तीन साथीदाराना इंग्रजी शिपायानी अटक केली. हंटरने फोडून काढीत साथीदारांची नावे सांगा अन्यथा दरीत ढकलण्यात येइल या धमकीलाही त्यांनी भिक न घालता त्यांनी साथीदारांची नावे न सांगितल्याचे सांगत आपल्या भावना ९२ वर्षांच्या जगन्नाथ नाईक व ८९ वर्षांच्या विनायक विठ्ठल म्हात्रे यांनी लोकमतपुढे व्यक्त केल्या.
सन १९३० सालापासून पालघर तालुक्यातील सातपाटी हे स्वातंत्र्य चळवळीचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील ४७ स्वातंत्र्यसैनिकापैकी हे दोनच स्वातंत्र्यसैनिक सध्या हयात आहेत. स्वातंत्र्यसैनिक धर्माजी तांडेल, नारायण दांडेकर, विठोबा पागधरे, बाबुराव जानु पाटील, पंडीत जगन्नाथ मेहेर, गणपत सोवार वैती इ. नेतृत्व ब्रिटीशाच्या जोखडातून आपल्या भारत मातेला सोडूवन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटलेले शेकडो महिला, पुरूष व निष्ठावान कार्यकर्ते सातपाटील तयार होत होते. १९३६ साली सातपाटीला श्रीराम मंदिरात सेवादलाचे शिबीर भरले होते. या शिबीरास जिल्हा संघटक पं. स. भागवत, आचार्य भिसे यानी तरूणांना समाजवादी विचारांची ओळख करून दिली. याने प्ररित होऊन सहावी इयत्ते शिकणाऱ्या जगन्नाथ नाईक, मोरेश्वर मेहेर, नारायण वैती, विनायक म्हात्रे, मंजुळा बाई पागधरे इ. विद्यार्थी चळवळीशी जोडले गेले.
घरातून शाळेत जातो असे सांगुन निघालेले हे तरूण आपले दप्तर श्रीराम मंदिराच्या मागे लपवून बैठका व आंदोलनामध्ये सक्रिय होऊ लागले. १४ आॅगस्ट १९४२ च्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठीची छापील पत्रके वाटत असताना जगन्नाथ नाईक, तुकाराम भोईर, मंजुळाबाई पागधरे, मोरेश्वर मेहेर यांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांना डांबून मारहाण करण्यात आल्याने घाबरून दोन कार्यकर्त्यांनी ही पत्रके वाटण्यासाठी दयानंद पाटकर यांनी दिल्याचे कबुल केले. मात्र इतर साथीदारांची नावे उघड होत नसल्याने फौजदार साळवी यांनी जगन्नाथ मेहेर व मोरेश्वर मेहेर यांना स्वत:च्या घरी नेऊन हंटरने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. मात्र, त्यांनी साथीदारांची नावे उघड केली नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांना माफी मागा नाहीतर दरीत ढकलून देण्यात येईल असा दम भरण्यात आला. नकार दिल्याने त्यांना तीन महिन्याच्या कारावासासाठी ठाणे कारागृहात पाठविण्यात आले.