Hunger of tribals weaving bamboo bonds, farmers prefer cloth strips | बांबूचे बंध विणणाऱ्या आदिवासींची उपासमार, शेतकऱ्यांची कापडी पट्ट्यांना पसंती 

बांबूचे बंध विणणाऱ्या आदिवासींची उपासमार, शेतकऱ्यांची कापडी पट्ट्यांना पसंती 

- सुनील घरत
 
पारोळ : कोरोनाच्या महामारीने अनेक व्यवसाय व उद्योग डबघाईला आले असतानाच शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध (बांबूपासून तयार केलेला दोर) खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने आदिवासी भागातील बंध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. भारे बांधण्यासाठी शेतकरी स्वस्तात मिळत असलेल्या कापडी पट्ट्यांचा उपयोग करीत असल्याने बंधांची विक्री होत नसल्याने आदिवासींसाठी दोन महिने चालणाऱ्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

भातपिकाची कापणी केल्यानंतर त्याचे भारे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना पाचशे ते दोन हजार नगापर्यंत बंधांची गरज भासते. आदिवासी बांधव जंगलातील लहान बांबूंपासून हे बंध बनवितात. वसई तालुक्यात घाटेघर, सायवन, काळभोन, लेंडी, तिल्हेर, करजोन या भागातून बंध तयार करून गावागावात किंवा आठवडे बाजारात विकतात. शेकडो महिला-पुरुष बंध विक्रीचा व्यवसाय दोन महिने भातकापणीच्या हंगामात करतात. त्यामुळे या व्यवसायातून चांगला रोजगारही मिळत असे. पण शेतकऱ्यांनी पट्टीला पसंती दिल्याने हा रोजगार आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. यंदा शेतीवर परतीच्या पावसाचे संकट आलेले आहेच, पण सर्वाधिक परिणाम हा सध्या भाताचे भारे बांधण्यासाठी कापडी पट्ट्यांचा मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या वापरामुळे बंध व्यवसायच धोक्यात आला आहे. 

बंध तयार करण्याची पद्धत
दोन-तीन दिवसांपूर्वीच तोडलेल्या ओल्या बांबूचे ५-६ फूट लांबीच्या अंतरावर तुकडे केले जातात. हे तुकडे दगडावर ठेचून ३-४ दिवस सुकविले जातात आणि शंभर बंधांचा गठ्ठा करून प्रति शेकडा (१०० नग) दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारात विकायला आणले जातात. दिवाळी सणादरम्यान होणाऱ्या या व्यवसायातून शेकडो कुटुंबांची दिवाळी आनंदात जात होती, मात्र कोरोना व कापडी पट्ट्यांच्या आलेल्या संकटामुळे हा व्यवसाय बंद करण्याची वेळ या आदिवासी कुटुंबांवर आली आहे.

Web Title: Hunger of tribals weaving bamboo bonds, farmers prefer cloth strips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.