वैतरणा खाडीपूल किती बळी घेणार? एक्स्प्रेसची धडक लागून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:20 IST2019-08-16T00:19:54+5:302019-08-16T00:20:23+5:30
आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.

वैतरणा खाडीपूल किती बळी घेणार? एक्स्प्रेसची धडक लागून एकाचा मृत्यू
पालघर : आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. शासन, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष अजून किती बळी घेणार अशी विचारणा वाढीववासी करत आहेत.
वाढीव येथील बेबी बाई भोईर या १ आॅगस्ट रोजी पालघरमध्ये रुग्णालयात दाखल आपल्या मुलीला डबा घेऊन जात होत्या. वैतरणा खाडीवरील एकमेव मार्ग असलेल्या या रेल्वे ट्रॅक जवळच्या मार्गावरून जात असताना पाय घसरून त्या खाली पडल्या. त्यांचा मृतदेह ४ दिवसांनंतर अर्नाळा भागात सापडला. गुरुवारी त्यांचे दिवस श्राद्ध होते. त्यांच्याच श्राद्ध कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी सकाळी खार्डी गावातील रमेश माळी सकाळीच घरातून वाढीवला जाण्यासाठी निघाले. वैतरणा स्टेशन पुलावरून ते दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असणाºया मोकळ्या जागेतून वाढीवच्या दिशेने जात असताना मागून येणाºया सौराष्ट्र एक्सप्रेसने त्यांना हॉर्न दिला. यामुळे माळी खाली बसले. मात्र, अत्यंत वेगाने आलेल्या एक्स्प्रेसने त्यांच्या डोक्याला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अशा अपघाताच्या घटनांनी शेकडोंचा आकडा पार केला असून रेल्वे पूल अथवा पर्यायी मार्ग उभारण्याच्या त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अजून या शासनाला किती बळी हवेत असा उद्विग्न सवाल अमित पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि सफाळे दरम्यान वैतरणा खाडीमध्ये वसलेले वाढीव-वैती पाडा हे सुमारे २ हजार लोकसंख्येचे गाव. २५-३० वर्षांपासून पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय अशा महत्त्वपूर्ण समस्यांनी ग्रासलेले आहे. वाढीव गाव शासनाच्या महसूल विभागाच्या नोंदीवर असले तरी जगण्यासाठी लागणा-या साध्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे स्वारस्य शासनाने दाखवलेले नाही. सुमारे २ हजार लोकसंख्येचे हे गाव किड्यामुंग्याप्रमाणे जीवन जगत आहे.