कोरोना संकटकाळात रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा; तरुणीस परत मिळाले १५ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 19:32 IST2021-04-15T19:32:30+5:302021-04-15T19:32:56+5:30
विजयराज यादव हे भाईंदर परिसरात रिक्षा चालवतात . दीपक रुग्णालयाल येथून मीरारोडच्या शांती पार्क असा अंजली लालिया यांनी विजयराज यांच्या रिक्षातून प्रवास केला होता .

कोरोना संकटकाळात रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणा; तरुणीस परत मिळाले १५ हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - कोरोनाच्या संकट काळात अनेकांची आर्थिक स्थिती हलाखीची असली तरी आपल्या प्रामाणिकपणावर अनेक लोकं समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत . रिक्षाचा व्यवसाय फारसा नसताना सुद्धा एक प्रवासी तरुणी रिक्षात विसरून गेलेली १५ हजार रुपयांची रोकड विजयराज यादव ह्या रिक्षा चालकाने लागलीच परत केली .
विजयराज यादव हे भाईंदर परिसरात रिक्षा चालवतात . दीपक रुग्णालयाल येथून मीरारोडच्या शांती पार्क असा अंजली लालिया यांनी विजयराज यांच्या रिक्षातून प्रवास केला होता . त्यांच्या नातलगास रुग्णालयात दाखल केले असल्याने त्या गडबडीत होत्या आणि रिक्षातच पिशवी विसरल्या .
विजयराज जेवायला बसले असता त्यांना प्रवाशाची पिशवी दिसली . आत मध्ये उपचाराची कागदपत्रे व १५ हजार रोख होती . त्यांनी त्यांचे परिचित वकिल राज पाल याना सदर बाब सांगितली. त्या वकिलाने रुग्णालयाच्या त्या कागद्पत्रावरील रुग्णाच्या नातलगाच्या क्रमांकावर संपर्क साधून तुमचे पैसे मिळाले असून नवघर पोलीस ठाण्यात येऊन घेऊन जाण्यास सांगितले .
रिक्षा चालक विजयराज हे पाल यांच्यासह नवघर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी पोलिसांना पैसे असलेली ती पिशवी स्वाधीन केली . वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी अंजली यांचे खातरजमा करून पैश्यांची पिशवी तिच्या स्वाधीन केली . पोलिसांनी रिक्षा चालकाचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले . तर पैसे परत मिळाल्याने अंजली यांनी रिक्षा चालकाचे आभार मानले .