एल्ब्रुझ शिखरावर हर्षालीने फडकवला तिरंगा; जगातील सात शिखरांपैकी दोन केली पादाक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:34 IST2019-08-18T00:34:09+5:302019-08-18T00:34:27+5:30
युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या एल्ब्रुझ शिखरावर वसईतील हर्षाली वर्तक हिने तिरंगा फडकावत देशाची मान उंचावली आहे. जगातील सात उंच शिखरांपैकी दोन शिखरे तिने आठ महिन्यात पादाक्रांत केली आहेत.

एल्ब्रुझ शिखरावर हर्षालीने फडकवला तिरंगा; जगातील सात शिखरांपैकी दोन केली पादाक्रांत
पालघर-वसई : युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या एल्ब्रुझ शिखरावर वसईतील हर्षाली वर्तक हिने तिरंगा फडकावत देशाची मान उंचावली आहे. जगातील सात उंच शिखरांपैकी दोन शिखरे तिने आठ महिन्यात पादाक्रांत केली आहेत. वसईतील मांडलई येथील हर्षाली अशोक वर्तक हिने शुक्रवारी रशियातील वेळेनुसार ७ वाजून ४० मिनिटांनी माऊंट एल्ब्रूस शिखर सर केले.
माऊंट एल्ब्रुस हे युरोप खंडामधील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची १८ हजार ५१० फूट म्हणजेच समुद्रसपाटीपासून ५ हजार ६४२ मीटर उंचावर आहे. हे शिखरकायम बर्फाच्छादित असून तेथील तापमान उणे २५ अंश व शिखरावर प्रतितास ३५ मैल इतका सोसायट्याचा वाऱ्याचा वेग असतो.
क्षणाक्षणाला बदलणाºया हवामानाला तोंड देत हर्षाली बेस कॅम्पवरून एल्ब्रूस समीटला (शिखराच्या टोकावर) पोहचायला ९ तास वेळ लागल्याचे तिने सांगितले. तिने अनेक अडचणींवर मात करत आपले ध्येय गाठताना शिखरावर पोहचताच तिरंगा फडकवला. ही कामगिरी यशस्वीपणे पार पडल्यानंतर काहीवेळ विश्रांती घेत तिने परतीच्या प्रवासाला सुरू केली. तीला परत आपल्या कॅम्पवर यायला केवळ ५ तास लागले.
माऊंट एल्ब्रूस हे जगातील ७ खंडांमधील रशियातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हर्षालीच्या या मोहिमेत इतर देशातील अन्य अकरा गिर्यारोहकांचा समावेश होता.मात्र त्यापैकी हर्षालीसह फक्त ७ गिर्यारोहकांनीच शिखरावर पोहचण्यात यश मिळवले. २२ आॅगस्टला भारतात परतणार असल्याची माहिती हर्षालीने दिली. गेल्यावर्षी हर्षालीने अफ्रिकेतील १९ हजार ३४० फूट उंच (५ हजार ८९६ मीटर) किलोमांजरो शिखर सर केले होते. तिने सह्याद्री पर्वत रांगेतील गडांमध्ये कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा, कलावंतीण असे अनेक ट्रॅक तिने पूर्ण केले आहेत.
ही शिखरे केली सर
हर्षालीने हिमालयातील अनेक शिखरे पादाक्रांत केली असून यामध्ये प्रामुख्याने माऊंट फ्रेंडशिप पीक ( ५ हजार २८९ मीटर ), माऊंट हनुमान तीब्बा ( ५ हजार ९९० मीटर ), माऊंट युनाम (६ हजार ११८ मीटर ), माउंट मेन्थोसा ( ६ हजार ४४३ मीटर), माऊंट फुजी (३ हजार ३७६ मीटर ) यांचा समावेश आहे.