टँकरच्या धडकेत आजी-नातवाचा चिरडून मृत्यू; विरारमधील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2024 17:30 IST2024-04-19T17:30:16+5:302024-04-19T17:30:27+5:30
अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून टँकर ताब्यात घेतला आहे

टँकरच्या धडकेत आजी-नातवाचा चिरडून मृत्यू; विरारमधील दुर्दैवी घटना
मनोज तांबे
विरार : विरार पश्चिमेच्या बचराज इमारतीत राहणारा लहान मुलगा आणि त्याच्या आजीचा टँकरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वायके इमारतीच्या खाली शुक्रवारी दुपारी २:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विवान यादव (वय ५) आणि त्याची आजी अमरावती यादव (वय ६०) अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी आजी अमरावती ही आपल्या नातू विवान याला शाळेत सोडण्यासाठी जात होती. यावेळी वायके इमारतीजवळील पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत विवान हा थेट टायरखाली आल्याने चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर आजी अमरावती यांना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर टँकरचालक टँकर तिथेच सोडून पळून गेला. मात्र, स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून जवळच्याच रुग्णालयात आजी अमरावती यांना दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या अपघातात यादव कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून टँकर ताब्यात घेतला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश टँकर चालक दररोज असेच बेदरकारपणे टँकर चालवत असतात. काही जण तर मद्यप्राशन केलेले असतात, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे टँकरच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.