ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी टिपेला
By Admin | Updated: April 15, 2016 01:08 IST2016-04-15T01:08:13+5:302016-04-15T01:08:13+5:30
या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून उमेदवार आपले पॅनल घेऊन मतदारांच्या घरी त्यांची मनधरणी करतांना व आश्वासनांची

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी टिपेला
विक्रमगड : या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून उमेदवार आपले पॅनल घेऊन मतदारांच्या घरी त्यांची मनधरणी करतांना व आश्वासनांची खैरात करतांना दिसत आहेत़
सर्वच राजकीय पक्षांनी परंपरागतपणे राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़ मात्र या निवडणुकांत विक्रमगड तालुक्यातील विक्रमगढ शहर वगळता ३५ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवणुकापैकी २० ग्रामपंचायतीवर ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाडयातील अनुसूचित जमातीच्या महिला सरपंचपदी विराजमान होणार आहेत़ या निवणुकांसाठी एकुण ६८ हजार २८६ मतदार आपला मतदाचा हक्क बजावणार आहेत़ त्यामध्ये पुरुषांच्या ३५०६५ तर महिलांची संख्या ३३,२०३ याप्रमाणे असल्याची माहिती निवासी तहसिलदार आयुब तांबोळी यांनी दिली़तालक्यात ३९ ग्रामपंचायती असून त्यापैकी ३५ ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला असल्याने त्यांच्या निवडणुका होत आहेत़ ३५ ग्रामपंचायतीच्या ३७६ जागांसाठी ११७६ अर्ज दाखल केले होते़ छाननीत २७ अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर २९३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७९३ रिंगणात आहेत़ नगरपंचायतीच्या मुददयावर विक्रमगडकरांनी बहिष्कार टाकल्याने आता ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे
येथील दऱ्या-खोऱ्यातील आदिवासी त्याच हालअपेष्टांमध्ये जीवन जगत आहे़ गावात त्यांना जगण्यासाठी रोजगार नसल्याने पावसाळा संपताच ८ महिने ते कामाच्या शोधार्थ शहरांत आपली मायभूमी सोडून स्थलांतर करीत आहेत़ तसेच रस्ते, शिक्षण, निवारा, शेतमालाला हमी भाव नाही, औदयोगीक वसाहतींचा अभाव, पाणी वीज सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता पुरविण्याबाबत लोकप्रतिनिधींना अपयश आलेले आहे़
या भागात मतदार आदिवासी समाजाचे प्राबल्य जास्त आहे़ परंतु जव्हार मोखाडा व विक्रमगड हे भागत काल आज व उदयाही विकासापासुन दुर्लक्षीत आहेत व राहाणार आहे कुणी काही करणार नाही असे आतापर्यतची परंपरा सांगते आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यातील गाव-खेडयातील काही भागातील मतदार नोटाचा वापर करणार असे सांगत आहेत़ विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीपासून येथील आदिवासींच्या नावाने कोटयावधी रुपये कागदोपत्री खर्च होतांना दिसत आहेत परंतु गेल्या ६६ वर्षात या भागाचा विकास करणारा सक्षम लोकप्रतिनिधी अजून या भागाला लाभलेला नाही.
या निवडणुकांसाठी भाजपा, माकपा, शिवसेना, राष्ट्वादी, कॉगे्रस, बहुजन विकास आघाडी,•भारिप, आमदामी पार्टी, आदी ७९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने चुरशीची अशी पंचरंगी लढत होत आहे़ मात्र खरी लढत ही गतवर्षीप्रमाणेच भाजपा, बहुजन विकास आघाडी व माकपा यांचेमध्ये अपेक्षित असल्याचे जाणकांराकडून सांगण्यात येते़ आता प्रचाराचा अंतीम टप्पा असल्याने प्रत्येक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, मोटर सायकल रॅली, तसेच मतदारांच्या घरी गल्ली-बोळातून फिरतांना दिसत आहेत़ त्यामुळे सर्वच परिसर प्रचारमय झालेला आहे.