The government says stay at home, but there is no place for electricity | शासन म्हणते घरीच बसा, परंतु विजेचा ठिकाणाच नाही

शासन म्हणते घरीच बसा, परंतु विजेचा ठिकाणाच नाहीशौकत शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, या आजाराला रोखण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत. शासनाने लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला असून, त्यासाठी प्रशासनाने संचारबंदीही लागू केली आहे. दरम्यान, उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच गेल्या महिन्याभरापासून दर पाच मिनिटांनी विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरात बसलेल्या लोकांचा जीव गुदमरू लागला आहे. 


 डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील ३० ते ४० गावांमध्ये सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत.
डहाणूच्या बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगाव या फिडर अंतर्गत ३० ते ४० गाव-खेडोपाड्याला चिंचणी सबस्टेशन अंतर्गत वीजपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या महिनाभरापासून सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाच मिनिटेदेखील वीजपुरवठा सुरळीत राहात नाही. सकाळी तसेच संध्याकाळी तसेच दुपारच्या सुमारास २५ ते ३०वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे टाळेबंदी व संचारबंदीमुळे घरात असणाऱ्या लोकांना कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे घामाघूम व्हावे लागते. अखेर लोकांना नाईलाजास्तव बाहेर पडावे लागते.


दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच या परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात काय परिस्थिती असेल, या भीतीने ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी केली खरी, परंतु प्रचंड उन्हाळ्यात जिवाची लाहीलाही होत असतानाच पाच मिनिटेही वीजपुरवठा सुरळीत राहात नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत आला आहे. पालघरच्या कार्यकारी अभियंत्यांनी या परिसरात विशेष लक्ष देऊन येथील विजेच्या जीर्ण, जुनाट तारा, कमकुवत ट्रान्सफॉर्मर, गंजलेले लोखंडी खांब, फ्यूज बॉक्स, ट्रान्सफॉर्मर ऑईलबरोबरच झंपर, मोडकळीस आलेले फ्यूज इत्यादी साहित्याच्या पुरवठा करण्याची मागणी होत आहे.


चिंचणी आणि वरोर फिडरच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याचे परीक्षण सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात या भागातील वीजपुरवठा सुरळीत होईल.
 - पी. मचिये, कार्यकारी अभियंता, 
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पालघर

Web Title: The government says stay at home, but there is no place for electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.