जव्हार, मोखाड्यातील दुष्काळाने पालकमंत्री ठरणार सर्वांचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:47 IST2019-01-21T00:47:45+5:302019-01-21T00:47:51+5:30
२०१९ ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे चित्र मार्च महिन्याच्या दरम्यान स्पष्ट होणार असले तरी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत.

जव्हार, मोखाड्यातील दुष्काळाने पालकमंत्री ठरणार सर्वांचे लक्ष्य
- रविंद्र साळवे
मोखाडा : २०१९ ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे चित्र मार्च महिन्याच्या दरम्यान स्पष्ट होणार असले तरी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. ते पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदार संघातील जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळी असतांना शासनाने सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे व महसूल विभागाने सुरवातीला आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दाखविल्यामुळे जव्हार मोखाडा हे तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून डावलले गेले यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दुष्काळाबाबत पालकमंत्र्यांची उदासीनता या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार असून विरोधकांना जव्हार मोखाडयातील जनतेला आकर्षित करण्यासाठी आयते - कोलीत मिळणार आहे पावसाने अडीच महिने हुलकावणी दिल्याने शेतीला आवश्यक पाणी मिळाले नाही यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उभे भात पीक पेटवून दिले. यानंतर पालकमंत्र्यांनी शेतक-याच्या बांधावर जाऊन भात पिकांची पहाणी केली तरी देखील जव्हार, मोखाडा हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट केले गेले नाहीत.
>सर्व पक्षांनी धरले होते विष्णूंना धारेवर
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस ने जव्हार मोखाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी होळी आंदोलन करून, बोंबाबोंब करीत १९ नोव्हेंबरला शिमगा साजरा केला होता यानंतर अंतिम आणेवारी आल्यानंतर १५ डिसेंबर पर्यंत जव्हार, मोखाडा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जातील असे अश्वासन देण्यात आले. परंतु हे आश्वासन नेहमीप्रमाणे हवेत विरल्याने येथील आदिवासींकडून पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड प्रमाणावर असंतोष खदखदतो आहे. यामुळे निवडणुकांमध्ये पालकमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावरु न लक्ष्य होणार हे मात्र नक्की.