जव्हारला उत्तम पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:53 IST2018-09-06T21:53:02+5:302018-09-06T21:53:10+5:30
जव्हारचे गतवैभव परत मिळवून देऊत असे सांगताना एक उत्तम पर्यटन शहर म्हणून सर्व सोयी-सुविधा विकसित केल्या.

जव्हारला उत्तम पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री
पालघर- जव्हारचे गतवैभव परत मिळवून देऊत असे सांगताना एक उत्तम पर्यटन शहर म्हणून सर्व सोयी-सुविधा विकसित केल्या जातील आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. जव्हारच्या पाणीपुरवठ्यासाठी 17.36 कोटी, पर्यटनवृद्धीसाठी 10 कोटी आणि शहरातील विकासकामांसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली.
जव्हार नगर परिषद स्थापन होऊन 1 सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित पर्यटन महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजे महेंद्रसिंह मुकणे, खासदार राजेंद्र गावित, कपिल पाटील, आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, रवींद्र फाटक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग आदींची उपस्थिती होती.
जव्हार संस्थानचे श्रीमंत राजे मार्तण्डराव मुकणे यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत 1 सप्टेंबर 1918 रोजी जव्हार नगर परिषदेची स्थापना केली होती. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुकणे राजघराण्याच्या नगर नियोजनाचा दृष्टिकोन होता. पण गेल्या 50 ते 60 वर्षांत या भागातील दीन दलित, आदिवासींपर्यंत विकास पोहोचलाच नाही. पश्चिम घाटातील हा सर्वांग सुंदर भाग निसर्ग सौंदर्यासाठी नव्हे तर कुपोषणासाठी ओळखल्या जाऊ लागला.
जव्हार शहराची हद्दवाढ करण्याच्या प्रस्तावास निश्चितपणे मान्यता दिली जाईल, खडखड धरणासह या भागातील पाण्याचे सर्व प्रश्न सोडविले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कुपोषणमुक्ती तसेच स्वच्छ भारतमध्ये पालघर चांगल्या पद्धतीने काम करीत असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन करताना त्यांनी पालघर जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजनेत उत्तम काम करून एकही कुटुंब बेघर राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. जव्हार हा पर्यटनाच्या क गटात असला तरी तो ब गटात आणण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल, असेही ते म्हणाले.