बँकांनी सील केलेल्या मालमत्ता स्वस्त दरात मिळवून देण्याचा बहाणा करून फसवणूक; टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:24 IST2023-02-15T17:24:12+5:302023-02-15T17:24:51+5:30
बँकांनी सील केलेल्या मालमत्ता/घरे स्वस्त दरात तडजोडीने मिळवून देण्याचा बहाणा करून सर्वसामान्य १५७ नागरिकांची ३ कोटी ७५ लाखांची फसवणूक फसवणूक करणाऱ्या चौघांच्या टोळीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश मिळाले आहे.

बँकांनी सील केलेल्या मालमत्ता स्वस्त दरात मिळवून देण्याचा बहाणा करून फसवणूक; टोळी गजाआड
नालासोपारा (मंगेश कराळे) - बँकांनी सील केलेल्या मालमत्ता/घरे स्वस्त दरात तडजोडीने मिळवून देण्याचा बहाणा करून सर्वसामान्य १५७ नागरिकांची ३ कोटी ७५ लाखांची फसवणूक फसवणूक करणाऱ्या चौघांच्या टोळीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश मिळाले आहे. चारही आरोपींना अटक करून तीन गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती पत्रकार परिषदेत गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पकडलेल्या चार आरोपीमध्ये दोघे वकील आहेत.
जून २०२१ ते २८ मार्च २०२२ यादरम्यान पियुषकुमार दिवाण (५६) यांना व त्यांच्यासह इतर ४४ लोकांना विरारच्या बोळींज येथील "बिडर्स विनर्स" या बोगस कंपनीचे चालक व बनावट नामधारक आरोपी प्रवीण ननवरे, नितीन शर्मा, राहुल भट्ट, अलायदा शहा यांनी बँकेने लिलावात काढलेली मालमत्ता/घरे एन पी ए तत्वावर स्वस्तात तडजोडअंती विकण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडुन ८० लाख रुपये स्वीकारली. त्यांना घर किंवा मालमत्ता न देता कंपनी बंद करून पळून गेल्याने अर्नाळा पोलिसांनी २८ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्तालयातील वसई विरार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. सदर गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने गुन्हयाचा तपास करून तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त बातमीवरुन आरोपी परवेज शेख उर्फ राहुल भट्ट उर्फ पीटर सिक्वेरा उर्फ आसिफ सैय्यद (३१), साहेब हुसेन शेख उर्फ नितीन शर्मा उर्फ प्रशांत बन्सल उर्फ सोहल शेख (२८), प्रवीण ननावरे आणि हिना चुडेसरा उर्फ अलायदा शहा उर्फ हिना सय्यद या चौघांना मिरा रोड, दहिसर, मुंबई आणि ठाणे येथून सोमवारी, मंगळवारी अटक करण्यात आली. या चारही आरोपींनी लँड लेडर आणि पाटील डिजिटल अश्या दोन इतर बोगस कंपनी स्थापन करून नागरिकांची फसवणूक केली होती. या आरोपीकडून अर्नाळा, आझाद मैदान आणि चितळसर मानपाडा या तिन्ही पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सागर बारवकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, वंदना लिल्हारे, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.