‘दिव्यलक्ष्मी’ची चार दिवसांनी सुटका
By Admin | Updated: February 21, 2016 02:31 IST2016-02-21T02:31:54+5:302016-02-21T02:31:54+5:30
समुद्रात मत्स्य दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मासेमारीच्या तयारीत समुद्रात जाण्यासाठी उभी असलेली दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपासून सातपाटी खाडीच्या गाळामध्ये

‘दिव्यलक्ष्मी’ची चार दिवसांनी सुटका
पालघर : समुद्रात मत्स्य दुष्काळाचे सावट घोंगावत असताना मासेमारीच्या तयारीत समुद्रात जाण्यासाठी उभी असलेली दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपासून सातपाटी खाडीच्या गाळामध्ये अडकून पडल्याने म्हात्रे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले होते. मदतीचा कुठलाही धागा दिसत नसताना सातपाटीचे मच्छीमार अनिल चौधरी यांनी आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह अत्यंत कठीण परिस्थितीतून त्या नौकेला बाहेर काढण्यात यश मिळविले. शुक्रवारी ही नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली.
सातपाटी हे मासेमारीसाठी प्रसिद्ध बंदर असून सुमारे ४०० नौकांद्वारे मासेमारी केली जाते. या मासेमारी बंदरामध्ये अनेक समस्या असल्याने जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासनाकडून सुमारे ३८ ते ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गावाच्या पश्चिमेकडील समुद्रातील खडक फोडणे, खाडीत सोयीसुविधा निर्माण करणे, मासळी बाजार बांधणे, खाडीत साचलेला गाळ काढणे इ. सोयीसुविधांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी अनेक कामे आजही प्रगतीपथावर आहेत. परंतु, खाडीतील गाळ काढण्यासंदर्भात मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी चालवलेली बेपर्वाई मच्छीमारांच्या मुळावर आली आहे. ४ वर्षांत ३ वेळा खाडीत पोहोचलेला ड्रेजर अधिकारी आणि काही अतिउत्साही मच्छीमारांच्या सूचनेमुळे खाडीतील गाळ काढण्यात यशस्वी ठरलेला नाही.
सातपाटी येथील पंकज सुभाष म्हात्रे यांची दिव्यलक्ष्मी ही नौका ४ दिवसांपूर्वी समुद्रात मासेमारीला जाण्याच्या तयारीत असताना खाडीतील गाळात अडकून पडली. अनेक प्रयत्नांनंतरही ही नौका ४ दिवस पार होऊनही गाळातून निघू शकली नाही. त्यामुळे पूर्ण म्हात्रे कुटुंब संकटात सापडले होते. मच्छीमार अनिल चौधरी यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, त्यांनी नौकेच्या एका बाजूने ५ फूट खोल आणि १०० फूट लांब खड्डा खणून भरतीच्या प्रवाहाच्या पाण्याने ही नौका सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. (वार्ताहर)