पालघरच्या समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट बुडाली; मच्छीमार बांधव सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 16:16 IST2020-04-10T15:33:23+5:302020-04-10T16:16:49+5:30
ही बोट वाचविण्यासाठी घिवली, दांडी, डहाणू आदी भागातील मच्छीमार आपल्या बोटी घेऊन घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचल्या आहेत.

पालघरच्या समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट बुडाली; मच्छीमार बांधव सुखरूप
पालघर:- तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या शेजारील घिवली गावातील दर्शन पाटील ह्यांची "उद्धारी माता प्रसन्न" ही बोट गुरुवारी रात्री मासेमारीसाठी गेली असताना खडकावर आदळून बुडाली. यातील पाच मच्छीमारांनी पोहत यशस्वीरीत्या खडकांचा आधार घेत आपला प्राण वाचवला. ही बोट वाचविण्यासाठी घिवली, दांडी, डहाणू आदी भागातील मच्छीमार आपल्या बोटी घेऊन घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचल्या आहेत.
घिवली येथील दर्शन पाटील हे गुरुवारी रात्री आपल्या चार सहकाऱ्यांसह गावासमोरील समुद्रात "तरती" जाळ्याद्वारे पापलेट, काटी, मुश्या आदी माश्यांची मासेमारी करण्यासाठी गेले होते. जात असताना रात्रीच्या अंधारात समुद्रातील खडकांचा अंदाज न आल्याने त्यांची बोट खडकावर आदळल्याने बोटीला भगदाड पडले. बोटीत पाणी शिरू लागल्याने बोट मालक दर्शन पाटील यांनी आपल्याजवळील मोबाईलद्वारे घरी संपर्क साधून अपघाताची माहिती कळवली. बोट समुद्रात बुडाली असून, आम्ही पोहत बाजूच्या खडकावर आश्रय घेतल्याचे सांगून आता समुद्राला ओहोटी असल्याने पाणी कमी झाल्यावर किनाऱ्यावर येऊ असे कळविले.
रात्रीच्या अंधारात अपघातस्थळी जाणे शक्य नसल्याने गावातील बोटींनी सकाळी भरती आल्यावर मदतीसाठी धाव घेतली. डहाणू, दांडी, आदी भागातील समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींनी ही समुद्रात बुडालेल्या बोटीला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती घटनास्थळावरून दीपेश तामोरे, नयन तामोरे, कैलास नाईक यांनी लोकमतला दिली. बोट आणि जाळी आदी साहित्यासह बोटमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.