Fishermen fearing sea conflict is life-threatening | मच्छीमारांची सागरी संघर्षाची खदखद ठरतेय जीवघेणी

मच्छीमारांची सागरी संघर्षाची खदखद ठरतेय जीवघेणी

मागील अनेक वर्षांपासून समुद्रातील मासेमारी हद्दीच्या महत्त्वपूर्ण विषयावर तोडगा काढण्यास केंद्र, राज्य शासनासह त्यांच्या मत्स्यव्यवसाय विभागाने दाखविलेल्या उदासीनतेमुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांच्या मनातील खदखद बाहेर निघू लागली आहे. अर्नाळा भागातील मच्छीमार डहाणूसमोरील समुद्रात मासेमारी करताना दिव-दमणच्या मच्छीमारांसोबत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तीन मच्छीमार जखमी झाल्याची घटना ताजी असून हा वाद पुन्हा यलोगेट पोलीस ठाण्यात पोचला आहे.

पालघर, डहाणू-दिव-दमण विरुद्ध वसई-उत्तन अशा सुरू असलेल्या संघर्षाची खदखद आता जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित होऊ लागली आहे. मत्स्य उत्पादनात होणाºया घटीमुळे माश्यांच्या थव्यांचा शोध घेत घेत मच्छीमार आपले ५०-६० वर्षांपासून लवादाने आखून दिलेले समुद्रातील क्षेत्र ओलांडू लागले आहेत.

अर्नाळा येथील रामदास हरक्या यांची ‘मच्छिंद्रनाथ’ ही बोट २७ जानेवारी रोजी समुद्रात मासेमारी करीत असताना दिव-दमण येथील ‘वैष्णव विश्वर’ या बोटीवरील लोकांशी भांडण झाले. त्यानंतर दिव-दमणच्या २५ ते ३० बोटींनी येऊन आपल्यावर हल्ला केल्याने तीन लोक जखमी झाल्याची तक्रार करण्याची प्रक्रिया अर्नाळ्यातील मच्छीमारांनी यलोगेट पोलीस स्थानकात करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी प्रादेशिक उपायुक्त, मुंबई यांना पाठवली आहे. हा मारहाणीचा प्रकार डहाणूच्या समोरील ३७ सागरी मैलांवरील २०-२-१९२ उत्तर व ७२-१८-२७० सागरी मैलावर झाल्याचे त्यांनी कळविले आहे.

समुद्रातही वसई-उत्तन विरुद्ध पालघर-डहाणू हा हद्दीचा प्रश्न मागील ४० वर्षांपासून खदखदत असून अनेक चर्चा, निवेदने, मंत्र्यांच्या भेटीअंतीही हा प्रश्न निकाली काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा वाद धुमसत राहात असून समुद्रात हाणामारीच्या घटना घडत आहेत. या वादासंदर्भात २० जानेवारी १९८३ रोजी २८ मच्छीमार गावांतील नेमलेल्या समितीची बैठक वडराईचे तत्कालीन मच्छीमार नेते आ. मारुतीराव मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.

प्रत्येक भागातील मच्छीमारांनी आपल्या गावासमोरील समुद्रात मासेमारी करावी, असा ठराव त्या बैठकीत घेण्यात आला होता. या ठरावाच्या अनुषंगाने सर्व मच्छीमारांकडून अंमलबजावणीही करण्यात येत होती. मात्र वंशपरंपरागत पद्धतीने ठरवून दिलेल्या मासेमारी नियमांना डावलून वसई, उत्तन भागातील काही मच्छीमारांनी आपले क्षेत्र सोडून थेट गुजरात राज्यातील भागापर्यंत अतिक्रमणे करायला सुरुवात केल्याचे पालघरमधील मच्छीमारांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे समुद्रात संघर्षाच्या सततच्या घटना घडू लागल्याने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी इक्बालसिंग चहल यांच्या दालनात १८ आॅक्टोबर १९९३ रोजी सर्व मच्छीमार प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता.

रक्तरंजित घटना घडल्यावरच शासनाला जाग येणार का?

एके ठिकाणी माश्यांचे प्रमाण घटत असताना त्यांच्या क्षेत्रातील मासेच इतर मच्छीमार आपल्या डोळ्यासमोरून घेऊन जाऊ लागल्याने त्यांच्या हताशेतून आता आक्रमकता निर्माण होऊ लागली आहे. खासदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या सातपाटी येथील भेटीदरम्यान मच्छीमारांनी त्यांची भेट घेत आपल्या व्यथा त्यांच्यापुढे सादर केल्या.

जिल्हाधिकाºयांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे तत्कालीन सहआयुक्त दिनेश पाटील यांना सातपाटी गावासमोर कवी मारणाºया मच्छीमारावर प्रथम कारवाई करीत दोन्ही गावातील मच्छीमारांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. मात्र मागील ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर राज्य व केंद्र शासन योग्य तो तोडगा काढू शकलेले नाही.

अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने राहणारे मच्छीमार आता एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत. याला सर्वस्वी राज्य शासन व त्यांचा मत्स्यव्यवसाय विभाग कारणीभूत असल्याचा आरोप आता मच्छीमारांमधून केला जात असून एखादी रक्तरंजित घटना घडल्यावरच शासनाला जाग येणार आहे काय? असा संतप्त सवालही या निमित्ताने विचारला जात आहे.

Web Title: Fishermen fearing sea conflict is life-threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.