माध्यमिकचा पहिला दिवस स्वच्छतेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:47 IST2020-11-23T23:47:02+5:302020-11-23T23:47:20+5:30

शासकीय यंत्रणेचा गोंधळ

The first day of secondary hygiene | माध्यमिकचा पहिला दिवस स्वच्छतेचा

माध्यमिकचा पहिला दिवस स्वच्छतेचा

तलासरी : सोमवारपासून इयत्ता ९ वी ते १२ वी माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण सोमवारचा शाळांचा पहिला दिवस शाळा स्वच्छतेतच गेला. शाळा सुरू होणार म्हणून काही मुले शाळेत आली, पण ऐनवेळी त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. मात्र, शाळेत आलेल्या मुलांची संख्या ही अल्प होती. त्यामुळे शाळा सुरू झाली, तरी शाळेत किती मुले येतील, याबाबत शंकाच आहे.

माध्यमिक शाळा इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण गोंधळलेल्या शासकीय यंत्रणेमुळे सोमवारचा दिवस मुलांना न शिकविता स्वच्छतेत गेला. सोमवारी शाळा भरविण्याच्या दृष्टिकोनातून शाळांची स्वच्छता करून सॅनिटायझरने फवारणी करून घेण्यात आली. 
काही शाळांनी मुलांना मास्कही वाटले, पण ऐनवेळी अधिकाऱ्यांचा  आदेश आला. शाळा भरविण्याच्या दृष्टीने सोमवारी नियोजन करा व मुलांना परत पाठवून द्या, असे सांगितल्याने आलेल्या मुलांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. तलासरी तालुक्यातील शाळा सुरू होतील, पण शाळांत किती मुले उपस्थित राहतील, याबाबत शंका आहे. तलासरी भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे सुट्टीमध्ये मुले काम करण्यास कारखान्यात जातात. सध्या कोरोनामुळे बालकामगार म्हणून गुजरातमधील कारखान्यात कामाला जात असल्याने त्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शिक्षकांना त्रासाचे जाणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी शाळांना फवारणी केली, पण मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणी केव्हा होणार, मानधनावरील शिक्षकांच्या नेमणुका कधी होणार, मुलांच्या कोरोना चाचण्या या सगळ्यांचा विचार गोंधळलेली शासकीय यंत्रणा करणार आहे की नाही, हा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

Web Title: The first day of secondary hygiene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.