पहिले पुस्तक कायम स्मरणात राहते!

By Admin | Updated: April 2, 2016 02:57 IST2016-04-02T02:57:11+5:302016-04-02T02:57:11+5:30

काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम

The first book is always remembered! | पहिले पुस्तक कायम स्मरणात राहते!

पहिले पुस्तक कायम स्मरणात राहते!

वसई : काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम तो गंध आपल्याला भेटतो आणि जगभरातल्या सर्व प्रकारच्या प्रदूषणांनंतरही आपण तो गंध कधीही विसरत नाही. माणूस सर्वकाही विसरून जातो, पण ज्या दिवशी हातात नवंकोरं पुस्तक आलेलं होतं, तो दिवस आपल्या कायमच स्मरणात राहिलेला असतो. ओल्या मातीचा गंध आणि नव्याकोऱ्या पुस्तकाचा गंध आपल्या स्मरणकुपीत कायमच एकत्र वास करीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवसाच्या निमित्ताने वसईतील बालसाहित्यिक व कवी सायमन मार्टिन यांनी लोकमतशी संवाद साधताना वाचनाची महती सांगितली.
पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून जिवंत झाडाचं कलेवर असते. आपलं सर्वस्व देऊन झाड पुस्तकाच्या रूपाने आपल्याला भेटायला आलेलं असतं. त्यात झाडाचा आत्मा असतो. जेव्हा पुस्तकाच्या सोबत आपण असतो, तेव्हा आपण झाडाच्या सावलीतच असतो. बालपणी रंगीबेरंगी चित्रांनी नटलेली जी पुस्तकं भेटलेली असतात, ती आपण कशी विसरू शकतो? पुस्तकावाचून कुणाचंही बालपण जाऊ नये, पण जगभरात अशी असंख्य छोटी मुलं असतात की, ज्यांच्या भाग्यात नवीन कोऱ्या पुस्तकांचा सहवासच नसतो. त्यामुळे त्यांचं बालपण एकतर खुरटून गेलेलं असतं किंवा करपून गेलेलं असतं, असेही त्यांनी सांगितले.
छोट्या मुलांची शाळा भरलेली आहे आणि गरिबीमुळे शाळेची पायरी चढू न शकलेली मुलं आशाळभूतपणे त्या शाळेच्या इमारतीकडे व शाळेत जाणाऱ्या मुलांकडे पाहत आहेत, असं चित्र आपण अनेकदा पाहिलं असेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे यापुढचं सर्व शिक्षण पुस्तकांशिवाय होऊ लागलंय. त्याचे फायदे-तोटे असू शकतात, पण पुस्तकाचा स्पर्श, रूप, रंग, गंध आणि सहवास मुलांना माणूस म्हणून घडवण्यासाठी अत्यावश्यक असतो. समाजातला ओलावा संपून जातो तेव्हा मुलांचा विचार बाजूला पडतो, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

सर्व प्रयत्न करून छोट्याचं भावविश्व समृद्ध करणारी अगणित पुस्तकं छापली जायला हवीत, ती त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवीत. गावागावांत बालवाचनालयं हवीत. त्यासाठी तरतूद हवी. उत्तम रस्ते, सुंदर घरं होत राहतील, पण बालमनावर संस्कार करणारी पुस्तकं नसतील तर बाप हो, विनाशाकडे आपण कायम प्रवास करीत राहू.
- सायमन मार्टिन, कवी-साहित्यिक

Web Title: The first book is always remembered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.