अखेर पालिका आयुक्त डी. गंगाथरन यांची बदली? अनिल पवारांची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 00:16 IST2022-01-03T00:09:19+5:302022-01-03T00:16:38+5:30
दरम्यान मागील आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर शुक्रवारी आयुक्तांची बदली करण्यात आल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे

अखेर पालिका आयुक्त डी. गंगाथरन यांची बदली? अनिल पवारांची जोरदार चर्चा
आशिष राणे
वसई - वसई विरार शहर महानगरपालिकेतील वादग्रस्त ठरलेले आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांची दोन दिवसांपूर्वी तडकाफडकी मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. गंगाथरन डी. यांचा प्रशासक कार्यकाळ जून २०२१ ला संपल्यावर पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी व वसई विरार शहरात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती.
दरम्यान मागील आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर शुक्रवारी आयुक्तांची बदली करण्यात आल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे. मात्र, अजूनही या वृत्ताला मंत्रालयातून किंवा पालिका आयुक्त कार्यालयातुन दुजोरा मिळू शकला नाही. अर्थातच बदली झालेल्या आयुक्त गंगाथरन डी. यांच्या जागेवर सिडकोच्या अनिल पवार यांचे वसई विरार पालिकेचे नवे आयुक्त म्हणून नाव चर्चेत आहे. यापूर्वीही दोन ते तीन वेळा गंगाथरन डी.यांच्या बदली बाबतच्या बातम्या समाज माध्यमातून बाहेर आल्या होत्या.
मुजोर व वादग्रस्त अधिकारी म्हणून नागरिकांनी नाकारले !
परिणामी वसई विरार महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर गंगाथरन डी. यांची पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशासक म्हणून आल्या पासूनच त्यांच्या अनेक निर्णयामुळे ते वादग्रस्त ठरले होते. त्यातच त्यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामे हि वाढली होती. तर दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्या मधील वाद हि उफाळून आले होते.
कर्मचाऱ्यांच्या बदल्या असोत किंवा पालिकेने खरेदी केलेल्या गाड्या यामुळे सुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात होती. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राजकीय नेत्यांना ,समाज सेवक असो किंवा पत्रकार मंडळीनादेखील त्यांनी कधीच विश्वासात घेतले नाही किंबहुना सर्वसामान्य नागरिकासोबत ही मुजोर वागले आणि त्यावरुनही वाद झाले होते.