स्मशानभूमीतील गॅस सिलेंडर अपहार प्रकरणी अखेर तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2023 20:34 IST2023-01-23T20:34:24+5:302023-01-23T20:34:39+5:30
महापालिकेच्या भाईंदर स्मशानभूमीत एलपीजी गॅस वर चालणारी शवदाहिनी आहे .

स्मशानभूमीतील गॅस सिलेंडर अपहार प्रकरणी अखेर तिघांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम स्मशानभूमीतील शवदाहिनीचे गॅस सिलेंडरचा अपहार करणाऱ्या स्मशानभूमीतील कंत्राटी कर्मचाऱ्यासह त्याचा मुलगा आणि अन्य एक अश्या तिघांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
महापालिकेच्या भाईंदर स्मशानभूमीत एलपीजी गॅस वर चालणारी शवदाहिनी आहे . सदर शवदाहिनी साठी लागणारे एलपीजी गॅस सिलेंडर हे नवकार गॅस एजन्सी यांच्या कडून पालिका खरेदी करते . तर गॅसच्या शवदाहिनीचे कामकाज पाहणाऱ्या शेखर इलेक्ट्रिक कंपनीचा कर्मचारी बबन खुळे याच्या ताब्यात गॅस सिलेंडर दिले जातात . ते सिलेंडर शवदाहिनीला जोडून त्यावर मृतांचे अंत्यसंस्कार केले जातात . मध्यंतरी गॅस सिलेंडर पुरेसे नाही म्हणून मृतदेह जळत नसल्याच्या तक्रारी होत्या .
दरम्यान गॅसच्या वापराच्या देयकामध्ये वाढ दिसुन आल्याने शहर अभियंता दिपक खांबीत यांनी चौकशी करण्याचे आदेश कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर याना दिले होते . जानकर यांनी चौकशी चालवली असता ठेकेदाराचा कर्मचारी बबन खुळे व त्याचा मुलगा राहुल तसेच मिराज आळी हे परस्पर स्मशानभूमीतील दोन गॅस सिलेंडर रिक्षातून घेवुन जाताना रंगेहाथ सापडले . या प्रकरणी आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशक नंतर पालिकेच्या वतीने जानकर यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बबन खुळेचा मुलगा राहुल याने पटाडीया कॉम्प्लेक्स मध्ये चायनीज हॉटेल सुरु केले आहे . त्या हॉटेलसाठी पालिकेच्या शवदाहिनीचे गॅस सिलेंडर वापरले जायचे . तसेच घरी सुद्धा सिलेंडर वापरासाठी नेले जायचे . स्मशानभूमीतील हा सिलेंडर घोटाळा गेल्या काही वर्षां पासून सुरु असल्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी तसेच शवदाहिनीसाठी वापरात आलेल्या गॅस सिलेंडर व पुरवठा याचे ऑडिट करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे .