बनावट खवा, मिठाईविरुद्ध एफडीएचे धाडसत्र

By Admin | Updated: September 15, 2015 23:05 IST2015-09-15T23:05:02+5:302015-09-15T23:05:02+5:30

गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने

FDA raids against fake Khwa, sweets | बनावट खवा, मिठाईविरुद्ध एफडीएचे धाडसत्र

बनावट खवा, मिठाईविरुद्ध एफडीएचे धाडसत्र

ठाणे : गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून धाडसत्रही सुरू केले आहे.
गुजरातमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर खवा येतो. तसेच तो पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातूनही येतो. अनेकदा त्यात भेसळ असते. तसेच तो शिळा असतो. अशा खव्यात पूर्वी विषबाधा होण्याच्या घटना घडल्याने त्याविरुद्ध आधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई एफडीएने सुरू केली आहे. शहा मणीलाल नरसी या फर्मवर धाड घातली असता शुद्ध पामतेलाच्या डब्यात तळणासाठी वापरून उरलेले खाद्यतेल भरलेले असल्याचे आढळून आले. तर कोपरखैरणे येथे मिठाईच्या दुकानावर धाड घातली असता काजूरोल या मिठाईत भेसळ केली असल्याचे आढळून आले. या दोन्ही धाडी शनिवारी घालण्यात आल्या. हे धाडसत्र अधिक व्यापक केले जाणार आहे.
खव्यामध्ये भेसळ करण्यासाठी उकडलेले बटाटे, रताळी, आरारुटची पावडर, तांदुळ आणि मैदा आदींचा वापर केला जातो. त्यातून अनेकदा विषबाधाही होऊ शकते. विशेषत: गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या काळात खव्यातल्या भेसळील अधिक ऊत येतो. म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. खव्याचे एकूण पाच प्रकार असतात. त्यातला पहिला असतो बाटी या खव्यात मॉईश्चर कमी असते. दुसऱ्याला चिकना म्हणतात. त्यामध्ये ५० टक्के मॉईश्चर असते. त्याचा वापर फॅन्सी मिठाईसाठी होतो. तिसऱ्या प्रकाराला दाणेदार असे म्हणतात. त्याचा वापर कलाकन आणि विविध प्रकारच्या बर्फी तयार करण्यासाठी होतो. तसेच पिंडी नामक खवा पेढे तयार करण्यासाठी वापरला जातो. तर धाप नावाचा खवा गुलाबजाम करण्यासाठी वापरला जातो.
खव्याचा भाव साधारणत: प्रतीनुसार २५० ते ५०० रुपये किलो आहे. एक लिटर दूध आटवले की, साधारणत: २०० ते २५० ग्रॅम खवा मिळतो. या हिशोबाने गोठ्यातले चांगले दूध ६० रुपये लिटर भावाचे धरले तर एक किलो खव्यासाठी ४ ते ५ लिटर दूध लागते. परंतु अनेक व्यापारी अशा पिवर खव्यात २० ते ३० टक्के भेसळ करतात आणि किलोमागे अधिक नफा मिळवू पाहतात. जो खवा सामान्य पेढे निर्मितीसाठी वापरला जातो त्यात ४० ते ५० टक्के भेसळ होऊ शकते.
ही भेसळ ओळखण्यासाठी एफडीएने अत्यंत सोप्या अशा पद्धती शोधून काढल्या आहेत. खव्यावर आयोडीनचे काही थेंब टाकले आणि तो निळा पडला तर त्यात मैदा अथवा तांदळाच्या पिठाची भेसळ केलेली आहे, हे लगेच कळून येते. याशिवाय सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा वापर करूनही भेसळ ओळखता येते. अनेकदा मिठाई फॅन्सी करण्यासाठी तिला चांदीचा वर्ख लावला जातो. अनेकदा तो खाण्याच्या प्रतिचा नसतो. तसेच मिठाईतील रंगही अनेकदा दुय्यम दर्जाचे असतात. त्यामुळे ग्राहकांनी फॅन्सी मिठाई खरेदी न करता रंग आणि वर्ख याचा वापर नसलेली पारंपारिक मिठाई खरेदी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.

Web Title: FDA raids against fake Khwa, sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.