Extreme violation of rules in Mira-Bhayander | मीरा-भाईंदरमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

मीरा-भाईंदरमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

- धीरज परब

तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वेगाने चालवण्याची नशा तर अतिशय घातक बनलेली आहे. शर्यती लावणे, दुचाकी चालवताना थरारक प्रकार करणे, वेगाने कट मारत दुचाकी चालवणे यामुळे शहरात अनेक तरुणांचे बळी गेले आहेत. स्टंटबाजांना पकडायला गेले तर दुचाकीस्वार तरुणांच्या जीवावर बेतेल, या काळजीने पोलीसही आक्रमक होत नाहीत. शिवाय, अशा दुचाकीस्वारांमुळे आजूबाजूच्या वाहन वा पादचाऱ्यांचाही अपघात होऊ शकतो.

शहरातील महामार्ग, वरसावेनाका, चेकनाका, काशिमीरानाका, सावरकर चौक, मीरा रोड व भार्इंदर रेल्वेस्थानक परिसर, शांतीनगर, शीतलनगरनाका, मॅक्सस मॉल परिसर, शांतीनगर, शांती गार्डन, भार्इंदर फाटक, खारीगावनाका, गोडदेवनाका, शिवसेना गल्लीनाका, उत्तननाका असे एकदोन नाही तर शहरातील जवळपास सर्वच प्रमुख नाक्यांवर कोंडी असते. नाकेच नव्हे तर प्रमुख रस्त्यांचाही कोंडमारा झालेला आहे.

आज काशिमीरानाका ते सावरकर चौकपर्यंतचा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, नवघर मार्ग, महात्मा फुले मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आदी एकही मुख्य रस्ता वाहतूक व रहदारीला मोकळा शिल्लक राहिलेला नाही.
बेशिस्त व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांसह रस्त्यांवर लागणारी बेशिस्त व बेकायदा पार्किंग, सर्रास लागणाºया हातगाड्या व फेरीवाल्यांसह दुकानदारांचे अतिक्रमण कोंडीला जबाबदार आहे. रस्त्यांची निकृष्ट कामे व पडणारे खड्डे तर नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत.

शहरात अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवूनही ती सुरू नाही. सिग्नलच्या वेळेचे नीट नियोजन केलेले नाही. दुरुस्तीच्या नावाखाली सिग्नल महिनाभर बंद असल्याचा अनुभव आहे. त्यातही मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सिग्नलचे पालन होत नाही. सिग्नल तोडून पळणे नेहमीचेच झाले आहे. सिग्नल तोडणाºयांवर नियमित कारवाई होत नाही. नाक्यांवर वाहतूक पोलीस असले तरी वॉर्डनना जास्त राबवून घेतले जाते. आज वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले जात असले तरी जे आहेत ते पोलीसही बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर सातत्याने कठोर कारवाई करत नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही.

पार्किंगची सोय करणे, सिग्नल देखभाल दुरुस्ती, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक, मार्गिका व डिव्हायडरला पट्टे मारणे आदी कामे महापालिकेची असली तरी ती केली जात नाहीत. आज झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच राहिले नसून या पट्ट्यांचा रंग लवकर उडतो तरी कसा, असा प्रश्न नागरिकांना पडतो. गतिरोधक आणि रस्त्यांमध्ये चौकउभारणीचे काम तर नगरसेवक, राजकारणी आपल्या राजकीय फायद्याचा विचार करून वाटेल तिकडे सांगत असतात.

Web Title: Extreme violation of rules in Mira-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.