भूकंपाने पुन्हा हादरली तलासरी परिसरातील घरे; नागरिकांत घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:25 IST2019-08-14T00:25:13+5:302019-08-14T00:25:32+5:30
तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला.

भूकंपाने पुन्हा हादरली तलासरी परिसरातील घरे; नागरिकांत घबराट
तलासरी : तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे पहाटे साखर झोपेत असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. अनेक जणांनी घराबाहेर धाव घेतली. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांची कारणमीमांसा शोधण्यास मात्र सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे.
मंगळवारी सकाळी बसलेला धक्का जोरदार होता. त्याची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली. मात्र, धक्क्यांची तीव्रता बघता झालेल्या नोंदीबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. भूकंपाच्या या जोरदार धक्क्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे महसूल विभागाने सांगितले.
नियमति बसणाऱ्या या धक्क्यांनी लोकांच्या मनात स्थलांतराचा विचार डोकावतो आहे. पण उपाय योजना करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होते आहे. घरे, शाळा, अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत. या धोकादायक घरात राहणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे.
सरकारी यंत्रणेकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे, तडे गेलेल्या घरांना अवघे सहा हजार रुपये दिले जातात. हे म्हणजे आपत्तीग्रस्त लोकांच्य जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शाळा, अंगणवाड्यांना महसूल कडून तंबूसाठी पुरविलेल्या ताडपत्र्या अडगळीत पडून वा गायब झाल्या आहेत. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्याकडून अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.