‘वॉटर व्हील’मुळे महिलांच्या डोक्यावरील ओझे झाले कमी; पाण्याची वाहतूक झाली सोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 09:34 AM2024-03-20T09:34:10+5:302024-03-20T09:34:46+5:30

ग्रामीण भागात पाणीटंचाईग्रस्त भागात होतोय सर्रास वापर

Due to the 'water wheel' the burden on women's head was reduced Transportation of water became easy | ‘वॉटर व्हील’मुळे महिलांच्या डोक्यावरील ओझे झाले कमी; पाण्याची वाहतूक झाली सोपी

‘वॉटर व्हील’मुळे महिलांच्या डोक्यावरील ओझे झाले कमी; पाण्याची वाहतूक झाली सोपी

हुसेन मेमन, लोकमत न्यूज नेटवर्क, जव्हार: अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून जव्हारची ओळख आहे. येथील डोंगर, दरी-कपारीत लोकवस्ती वसलेली आहे. या भागातील उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई नेहमीच भासते. त्यामुळे महिलांना अनेक किमीवरून पाण्याचे हंडे भरून डोक्यावरून वाहावे लागतात. यावर मात करण्यासाठी आता ‘वॉटर व्हील’ उपलब्ध झाले आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरचे ओझे कमी झाले असून, किमान दोन-तीन हंडे पाण्याची सहज वाहतूक करणे सोपे होत आहे.

सरकारी तरतूद नसल्याने व व्हीलची किंमत जास्त असल्याने गरीब आदिवासी लोकांना खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे सामजिक संस्थांच्या वाटपावरून येथील गरजूंना निर्भर राहावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वॉटर व्हीलने पाणी वाहतूक करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लांबहून पाणी वाहतूक करणाऱ्या गावपाड्यांना याचा फायदा होत आहे. वॉटर व्हीलची साधारण ४५ लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. 

  • अशी आहे रचना

-वॉटर व्हील प्रत्यक्षात आफ्रिका देशातून भारतात विकसित झाली आहे. ही पद्धत आधी तिथे अवलंबली गेली, त्याला यश मिळाल्याने भारतात त्याची प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या मोठ्या निर्मात्या कंपन्यांनी विकसित करून बाजारात उपलब्ध करून दिली आहे. 
-साधारण या वॉटर व्हीलची किंमत चार हजारांपर्यंत आहे. पाणी भरताना एका बाजूला झाकण देण्यात आले असून, त्यात पाणी भरून टायरसारखे ढकलत थेट पाणी घरापर्यंत नेता येते. वाहतुकीस सोपे असल्याने याला जास्त पसंती दिली जात आहे. 
-वॉटर व्हीलमुळे ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त भागात याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, सरकारकडून अद्याप वॉटर व्हीलसाठी वेगळी तरतूद नसल्यामुळे सामाजिक संस्थांच्या माध्यमांची वाट बघावी लागत आहे.

उच्च दर्जाचे जाड प्लास्टिक पावडर कोटेड कोट वापरून गोल आकार देऊन टायरसारखे ड्रम बनवून त्याला हाताने ढकलण्यासाठी दोन्ही बाजूंनी लोखंडी गोल पाइपद्वारे हॅण्डल तयार करण्यात आले आहेत. वॉटर व्हील हा मानवी पाणी पिण्यासाठी उच्च घनता पॉलिथिलिनचा वापर करून तयार करण्यात आला आहे. जेणेकरून यातून आणलेले पाणी शुद्ध व मानवी जीवनात योग्य राहील.

टंचाईग्रस्त भाग व लांब-लांबहून पाणी वाहतूक करणाऱ्या गावपाड्यांना वॉटर व्हीलची खूपच गरज आहे. शासनाने वॉटर व्हीलसाठी वेगळी तरतूद करावी. यामुळे ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल.
- सुरेश गवळी, ग्रामस्थ, शिरोशी, जव्हार

Web Title: Due to the 'water wheel' the burden on women's head was reduced Transportation of water became easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.