ड्रायव्हरचा खून करणाऱ्या क्लीनरला अटक, वालीव पोलिसांनी केलेल्या कारवाईत साथीदारांनाही बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:15 IST2017-09-11T05:06:56+5:302017-09-11T05:15:39+5:30
मुंबईतील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमधील माल लुटण्यासाठी ड्रायव्हरचा खून करून साथीदारांसह पसार झालेल्या क्लीनरला त्याच्या साथीदारांसह वालीव पोलिसांनी अटक केली आहे.

ड्रायव्हरचा खून करणाऱ्या क्लीनरला अटक, वालीव पोलिसांनी केलेल्या कारवाईत साथीदारांनाही बेड्या
वसई : मुंबईतील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमधील माल लुटण्यासाठी ड्रायव्हरचा खून करून साथीदारांसह पसार झालेल्या क्लीनरला त्याच्या साथीदारांसह वालीव पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सारी जहागीरपट्टी येथील महेंद्र प्रताप सिंग हे मुंबई येथील सय्यद नौशाद यांच्या कंपनीत ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. ते १४ आॅगस्टला जालन्याहून मालाने भरलेला ट्रक घेऊन तळोजा येथे निघाले होते. त्यांच्यासोबत
क्लीनर वसीम हनिफ अहमद खान हाही होता. हा ट्रक १५ आॅगस्टला तळोजा येथे पोहोचणे अपेक्षित होते. परंतु तो न पोहोचल्याने मालक सय्यद नौशाद यांनी त्या ट्रकचा शोध घेतला असता तो मालासह नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा येथे
आढळून आला होता. चालक महेंद्र सिंग आणि क्लीनर वसीम दोघेही गायब होते. ते बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर वालीव पोलिसांनी क्लीनर वसीमला
मुंब्रा येथील दहिसर गावातून अटक केली.
चौकशीत त्याने ट्रकमधील माल लुटण्यासाठी चालक महेंद्र सिंग यांची आपल्या दोन साथीदारांसह हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी महेंद्र सिंग यांचा मृतदेह शोधून काढून ताब्यात घेतला. तसेच वसीमचे साथीदार सलाउद्दीन समशुद्दीन शेख (२४, रा. गोवंडी) आणि शंकर या दोघांना अटक केली आहे.