काहिली वाढल्याने थंड पेयांची मागणी वाढली,लिंबू व कोकम सरबतचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:39 IST2019-04-16T00:39:02+5:302019-04-16T00:39:08+5:30
प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे.

काहिली वाढल्याने थंड पेयांची मागणी वाढली,लिंबू व कोकम सरबतचे आकर्षण
नालासोपारा : प्रचंड उकाडा व घशाला सतत पडणारी कोरड यामुळे वसईमध्ये जागोजागी थंड पेयाची मागणी वाढली आहे. लोकलमधुन उतरणाऱ्या प्रवाशांचे पाय आता रेल्वे स्टॉल कडे तर बस, खाजगी वाहनातील प्रवासी थंड पेयाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे स्टॉल धारकांनी ही खादयपदार्थ पेक्षा थंड पेय विक्र ी वर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे.
सामान्य प्रवाशांची लिंबूपाणी व कोकम सरबतला पसंती असल्यामुळे सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहे. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक रेल्वेच्या उपनगरीय गाडीने प्रवास करतात विशेषत: सकाळी वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातून लाखो प्रवासी मुंबई, ठाणे, दिवा, डहाणू साठी प्रवास करतात दीड ते दोन तासांच्या प्रवासात उकाड्यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण होत आहेत.
लोकलमधुन उतरल्यानंतर पहिल्यांदा स्टेशनवरील स्टॉल गाठतात तर बस व अन्य वाहनातील प्रवासी थंड पेयाची गाडी शोधत चार ते पाच रु पयात मिळणाºया लिंबू पाणी, कोकम सरबतला पसंती देत आहेत. अनेक जण एका स्टॉलवर दररोज सुमारे २० ते ३० लीटर लिंबु पाण्याची विक्र ी होत असल्याचे विरार, नालासोपारा येथील स्टॉलधारकांचे म्हणणे आहे. मिनरल पाणी, कोल्ड्रिक व अन्य पेयाची मागणी नेहमीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्था पेक्षा थंडपेयांना जास्त मागणी असते. काही महत्वाच्या रेल्वे स्टॉलवर मोसंबी, गाजर, अननस आदी फळांचे ज्यूस स्टॉलवरही प्रवासांची गर्दी दिसून येते. बच्चे कंपनी काला खट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्यात मग्न झाले असल्याचे दिसून येते. उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिला वर्ग तोंडाला स्कार्फ बांधून प्रवास करीत आहेत.
कुर्ला रेल्वे स्थानकात लिंबू सरबत बनविण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर बाहेरील खाद्य पदार्थ, ज्यूस, सरबत व शीतपेयांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च मिहन्याच्या अखेरीला तापमान ४० डिग्रीच्या आसपास पोहचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. तापमान वाढीमुळे शरीरातील पाणी कमी होते व आपणास तहान जास्त लागते, कामावर जाणाºया चाकरमान्यांनी ग्लुकोज पाणालाही पसंती दिली आहे.
>उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते. परिणाम थेट शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबूपाणी जास्त सेवन करावे, यात सी जीवनसत्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वयोवृध्द नागरिकांस जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. ज्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीज मधील पाणी घातक असून यामुळे घशाचे विकार होवू शकतात. बाहेरील अशुध्द पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार डोके वर काढू शकतात.
- डॉ. सचिन पाटील