इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे अभ्यास करून डॉ. अजय डोके यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवले युपीएससीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 23:41 IST2025-04-22T23:40:48+5:302025-04-22T23:41:44+5:30

मोबाइलचा योग्य कामासाठी वापर करून मुलांनी अशा परीक्षांत यश मिळवावे, असा सल्ला डॉ.अजय यांनी दिला आहे.

Dr. Ajay Doke cracked UPSC in his first attempt by studying through videos on the internet | इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे अभ्यास करून डॉ. अजय डोके यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवले युपीएससीत यश

इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे अभ्यास करून डॉ. अजय डोके यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवले युपीएससीत यश

हुसेन मेमन -

जव्हार - मंगळवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील पहिले कोगदे या गावातील डॉ.अजय काशिराम डोके यांनी ३६४ वा रॅँक (All India Rank) मिळवला आहे. आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारे डॉ. अजय डोके हे पहिलेच युवक ठरले आहेत. विशेष म्हणजे कोणताही क्लास केवळ इंटरनेटवरील व्हिडीओच्या माध्यमातून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे. मोबाइलचा योग्य कामासाठी वापर करून मुलांनी अशा परीक्षांत यश मिळवावे, असा सल्ला डॉ.अजय यांनी दिला आहे.

डॉ.अजय यांच्या या यशात त्याचे वडील काशिराम डोके व त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. बालपणापासूनच अजय यांची कुशाग्र बुद्धिमत्ता होती. त्यांना वाचनाचे, लेखनाची आवड होती. अभ्यासाच्या जोरावर चांगले गुण मिळाल्याने अजयचा ब्रम्हाव्हॅली येथे ६ वी इयत्तेत प्रवेश निश्चित झाला. ब्रम्हा व्हॅली येथील शालेय प्रवेश हाच अजयच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. तेथे ६ वी ते १२वी पर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण घेताना विज्ञान शाखा घेऊन १२ वी विज्ञान शाखेत यश मिळवून के. ईम. वैद्यकीय महाविद्यालय, मुंंबई येथून एमबीबीएससाठी प्रवेश घेऊन त्यांनी डॉक्टर डिग्री संपादन केली. तेथे राहत असतानांच अजयने युपीएससी परीक्षा दिली होती. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा कोणताही क्लास न लावता यश मिळवले आहे.

मी युपूएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एव्हढेच सांगू इच्छितो की, आज कोणत्याही प्रकारचे क्लास न लावताही केवळ इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. आपल्या ग्रामीण भागातील मुलांनीही मोबाइल, लॅपटॉपचा योग्य वापर केला तर कमी खर्चात गरीब मुलांनाही युपीएससी पास होणे अशक्य नाही.
डॉ. अजय डोके, जव्हार

ग्रामीण आदिवासी भागांत चमत्कार झाल्यासारखी गोष्ट आहे. या विद्यार्थ्याने केलेल्या यश संपादनतेवर बोलण्यासाठी शब्द नाहीत. डॉ.अजय डोके यांनी देशातील सर्वोच्च परीक्षेत यश संपादन केल्याचा आनंद आहे.
- डॉ. हेमंत सवरा,खासदार

 

Web Title: Dr. Ajay Doke cracked UPSC in his first attempt by studying through videos on the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.