पालघरात डॉक्टरांचा मूक मोर्चा
By Admin | Updated: March 22, 2017 01:18 IST2017-03-22T01:18:22+5:302017-03-22T01:18:22+5:30
राज्यातील निवासी डॉक्टरावरील वाढत्या हल्ल्याच्या त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांना सुरक्षा पुरविण्यास

पालघरात डॉक्टरांचा मूक मोर्चा
पालघर : राज्यातील निवासी डॉक्टरावरील वाढत्या हल्ल्याच्या त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांना सुरक्षा पुरविण्यास शासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर’ डॉक्टर वाचला तर रुग्ण वाचेल या स्लोगन घेऊन मूक मोर्चा काढण्यात आला.
मागील दोन वर्षात डॉक्टरावरील हल्ल्याच्या ४५ घटना घडल्याअसून ह्या प्रकरणाची पोलिसात तक्रार नोंदवूनही आरोपीवर अजून कारवाई झालेली नाही. रु ग्णालये, आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची नेमणूक करू असे, आश्वासन देऊन दोन वर्षे झाली मात्र अजूनही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे डॉक्टरांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
त्यामुळे धुळ्यासह इतर भागातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणे,कायद्याची कठोरपणे अमलबजावणी करणे, सर्वामध्ये जनजागृती करणे, हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी एक परिपूर्ण यंत्रणा उभारणे, शासकीय रु ग्णालयातील डॉक्टर व डॉक्टरेतर कर्मचारांचे संरक्षण करण्यासाठी यंत्रणा उभारणे, डॉक्टर संरक्षण कायदा २०१० ची परिणामकारक प्रभावी अंमलबजावणी करावी, या कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपींवरील खटल्याची जलद न्यायालयामार्फत सुनावणी व्हावी या मागण्या करणारे निवेदन देण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजता पालघर रेल्वे स्टेशन येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. त्यात वसई ते डहाणू दरम्यानच्या सर्व पॅथीचे डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ, नर्सेस, लॅब मालक-स्टाफ, अॅम्बुलन्स चालक, मेडिकल स्टोअर चालक सहभागी झाले होते. हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी अडविल्या नंतर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष संखे, उपाध्यक्ष डॉ. दिपक शाह, सचिव डॉ. रत्नाकर माने,डॉ.प्रकाश गुडसुरकार, डॉ.हेमराज करवीर, डॉ.सूर्यराज संखे,डॉ.उमेश डुंम्पलवार,डॉ.भार्गव ठाकूर,डॉ.कंपली आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन चर्चा केली.
(वार्ताहर)