घर घेताना फसू नका, नगररचनाकडून इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:46 IST2019-02-25T22:46:18+5:302019-02-25T22:46:21+5:30
अधिकृत शिक्का : अनधिकृत कामे

घर घेताना फसू नका, नगररचनाकडून इशारा
वसई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांनी वसई विरार शहरात हजारो अनधिकृत इमारती बांधल्या आहेत. आता महानगरपालिकेची अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन अनधिकृत इमारती बांधल्या जात असल्याचे उघड झाले आहे.
महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर बांधकाम परवानगी दिल्याची यादी प्रसिध्द केल्याने संबंधित इमारत जरी अधिकृत असली तरी प्रत्यक्षात त्यात वाढीव बांधकामे केली जात आहेत. ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी घरे घेण्यापुर्वी नगररचना विभागात संपर्क करावा, असे आवाहन वसई-विरार महानगरपालिकेने केले आहे.
शहरात हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यात सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक झालेली आहे. बांधकाम व्यावसायिक बनावट कागदपत्रे, बनावट बांधकाम परवागन्या दाखवून ग्राहकांना इमारती मधील घरे विकत होती. एकदा विक्री झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक हात वर करून पसार होतात अन् रहिवाशांना भोग भोगावे लागतात. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही आणि परिणामी नळ जोडणी मिळत नाही. तसेच शास्तीचा भुर्दडही भरावा लागत आहे. त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर बाधकाम परवागनी टाकण्यात आली आहे. मात्र विकासक बांधकाम परवानगी घेऊनही वाढीव अनधिकृत बांधकामे करत असल्याचे उघड झाले आहे. हे रोखण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलेले आहे.
संकेतस्थळावरून मिळू शकेल माहिती
नागरिक संकेतस्थळावर पडताळणीसाठी जात नाहीत. त्यांना भूमापन क्र मांक, बांधकाम परवागनी यांची माहिती नसते. ज्यांना माहिती असते त्यांची देखील यामुळे फसगत होत असते. त्यामुळे मागणी केल्यास महापालिकेना अनधिकृत इमारतीचा तपशील, ती बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची नावे संकेतस्थळावर प्रसिध्द करणार आहे. यामुळे नागरिकांना संबंधित प्रकल्प अनधिकृत आहेत का ते सहज कळू शकणार आहे.
नागरिकांनी पालिकेत चौकशी करावी. त्यांनी वसई विरार शहरात घरे घेण्यापर्ू्वी संबंधित प्रकल्पाची कागदपत्रे पडताळणीसाठी नगररचना कार्यालयात भेट देऊन करावी
- संजय जगताप,
नगररचना उपसंचालक,
वसई-विरार महापालिका