जि.प.चा महिलाभिमुख अर्थसंकल्प
By Admin | Updated: March 25, 2017 01:08 IST2017-03-25T01:08:28+5:302017-03-25T01:08:28+5:30
पालघर जिल्हा परिषदेचा १४ लाख ५२५ रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्पास शुक्रवारी जिल्हापरिषदेने मान्यता दिली.

जि.प.चा महिलाभिमुख अर्थसंकल्प
हितेन नाईक / पालघर
पालघर जिल्हा परिषदेचा १४ लाख ५२५ रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्पास शुक्रवारी जिल्हापरिषदेने मान्यता दिली. माहिलाभिमुख आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी भक्कम तरतूद असणारा एक आगळावेगळा असा हा वर्ष २०१६-१७ चा व २०१७-१८ चा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे सभापती सचिन पाटील ह्यांनी सादर केला.
उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी सभे पुढे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गटनेते निलेश गंधे ह्यांनी महिलांच्या विकासाकडे लक्षकेंद्रित करणारा ह्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. कुष्ठरोग निर्मूलन, अमृत आहार, सामुदायिक विवाह, जिप शाळांच्या वीज बिलांसाठी तरतूद व नर्सरी शाळात इंग्रजी माध्यमाची केलेली तरतूद आदींचा उल्लेख करीत गंधे ह्यांनी ठाणे जिल्हापरिषदेच्या तुलनेने हा अर्थसंकल्प लहान जरी असला तरी सर्व समावेशक व तळागाळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न ह्यातून झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले.
वाडा येथील जिप शाळेमध्ये झालेल्या अपघातात तन्वी धानवा ह्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तिच्या नावाने एखादी योजना सुरु करावी ही मागणी ह्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाली नसल्याबद्दल तसेच सदस्यांसाठी प्रशिक्षण दौऱ्या बाबत तरतूद नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र हा माहिलाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे सांगितले जात असले तरी काहीतरी नाविन्यपूर्ण असेल अशी आशा फोल ठरल्याचे जिप सदस्य काशीनाथ चौधरी ह्यांनी सांगितले. महिलांना वाहन चालक प्रशिक्षण आणि टंकलेखन, संगणक प्रशिक्षण, घरघंटी पुरविणे आदिपर्यंत मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले असते तर ते अधिक समयोचित ठरले असते असे ते म्हणाले. सध्या शासन डिजिटल भारता भोवती फिरत असून गुणवत्ते कडे मात्र लक्ष पुरविले जात नसल्याची टीकाही त्यांनी ह्यावेळी केली.