जिल्हा परिषदेच्या नळ योजनेच्या विहिरीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:08 IST2020-02-16T00:08:11+5:302020-02-16T00:08:23+5:30
जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

जिल्हा परिषदेच्या नळ योजनेच्या विहिरीची दुरवस्था
विक्रमगड : तालुक्यातील माण मार्गावर उल्हासराव भोईर आश्रमशाळा असून येथे जवळजवळ ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळेत पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ योजना असून या योजनेची पूर्ण दुरवस्था झालेली आहे. विहिरीचा कठडा तुटलेला आहे. आतमधील पायटिंग तुटलेली आहे व ही विहीर जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात विहिरीत खराब पाणी जाते. तसेच विहीर विद्यार्थ्यांसाठी धोकादायक झालेली आहे. यासाठी या आश्रमशाळेने चार ते पाच महिन्यांपूर्वी ग्रामीण नळपाणी पुरवठा विभाग पालघर व विक्रमगड या कार्यालयात दुरुस्तीसंदर्भात पत्र दिले आहे, परंतु या पत्राची आजपर्यंत काहीच दखल घेतलेली दिसत नाही.
पाणी पुरवठ्यावर प्रशासन लाखो रुपये खर्च करीत असताना या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेतील नळ योजनेकडे केव्हा लक्ष देणार, असा सवाल पालकांनी केला आहे. ही योजना जिल्हा परिषद ठाणे २००३-०४ मध्ये झालेली आहे. आजपर्यंत या योजनेची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. जवळजवळ १९ वर्ष जुन्या योजनेवर खर्च करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करीत आहे. या नळ योजना दुरुस्तीसाठी संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाहून आलेले आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या योजनेची दुरुस्तीची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असताना ते जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप पालकांकडून केला जात आहे.