धुंद अभियंत्यांची बडतर्फी तोंडीच

By Admin | Updated: February 7, 2017 03:52 IST2017-02-07T03:52:03+5:302017-02-07T03:52:03+5:30

पंधरा-वीस हजार रुपये पगार असलेल्या ठेका अभियंत्याच्या बर्थ डे पार्टीतील महागडी दारु आणि फटाक्यांच्या तुफान आतषबाजीची १२ ठेका अभियंत्यांची झिंंग महापालिका

Dhandh Engineers | धुंद अभियंत्यांची बडतर्फी तोंडीच

धुंद अभियंत्यांची बडतर्फी तोंडीच

शशी करपे , वसई
पंधरा-वीस हजार रुपये पगार असलेल्या ठेका अभियंत्याच्या बर्थ डे पार्टीतील महागडी दारु आणि फटाक्यांच्या तुफान आतषबाजीची १२ ठेका अभियंत्यांची झिंंग महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिलेल्या त्यांच्या तोंडी बडतर्फीच्या आदेशाने उतरली आहे. मात्र, सोमवारी संध्याकाळपर्यंत संबंधीत ठेकेदाराला त्यासंंबंधीचे कोणतेच आदेश आयुक्त अथवा महापालिकेकडून प्राप्त झालेले नव्हते. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांशी त्यांचे असलेले संबंध मात्र यामुळे चव्हाट्यावर आले आहेत.
स्वच्छ भारत अभियानासाठी केेंद्रीय पथक येणार असल्याने सुट्टी असतांनाही रविवारी महापालिकेत आयुक्तांसह सर्वांनीच हजेरी लावली होती. मात्र, दुपारी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या १२ ठेका अभियंत्यांनी चाळ माफिया आणि अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बिल्डर्सबरोबर मद्यपार्टी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महापालिकेची प्रतिमा मलीन करणाऱ्या १२ अभियंत्यांची सफाई करण्याचे काम आयुक्तांना करावे लागले.
या पार्टीत हे महापालिका अभियंते पल्लू के निचे छुपा रखा है, उठा दू हंगामा हो. या गाण्यावर मद्यधुंद अवस्थेत नाचतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विदेशी दारु, मच्छी,मटण आणि डीजेच्या आस्वादासह फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आल्याचे व्हिडीओत दिसून आले. वसईच्या समुद्र किनारी रात्रभर रंगलेली ही पार्टी ठेका अभियंता स्वरुप खानोलकर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाळमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्सनी दिल्याचे बोलले जात आहे.
स्वरुप खानोलकर हा काही वर्षांपासून महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहे. ठेका अभियंता असतांनाही त्याने अनधिकृत बांधकामांतून लाखो रुपयांची माया गोळा केल्याची चर्चा केली जात होती. गंभीर तक्रारी झाल्याने त्यांना काही दिवस घरी बसविण्यात आले होते. पाच महिन्यांपूर्वी पुन्हा कामावर घेतलेल्या खानोलकर यांना अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचा मुख्य अभियंता नेमण्यात आले होते. विशेष म्हणजे या पथकात तब्बल १४ कायम स्वरुपी सहाय्यक आयुक्त कार्यरत असताना अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून त्याविरुद्ध कारवाईची मोहिम आखण्याची जबाबदारी खानोलकर यांच्याकडे होती. आता आयुक्तांनी दिलेल्या या अभियंत्यांच्या तोंडी बडतर्फीच्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Dhandh Engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.