सफाळेमधील गावठी बंदुका, काडतुसे बनवण्याचा कारखाना उदध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 23:44 IST2019-10-16T23:44:30+5:302019-10-16T23:44:38+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया होण्याचा इशारा सुरक्षा यंत्रणे कडून देण्यात आल्याने महत्त्वाची कार्यालये, पक्ष संघटना यांच्या कार्यालयांना टार्गेट करण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

सफाळेमधील गावठी बंदुका, काडतुसे बनवण्याचा कारखाना उदध्वस्त
पालघर : सफाळे भागातील सोनावे फोंडा पाडा गावाच्या हद्दीतील गावठी बंदुका, जिवंत काडतुसे बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात दहशतवादी विरोधी पथकास मंगळवारी यश आले आहे. एका आरोपीसह तीन बंदुका, काडतुसे आणि बंदुका बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाया होण्याचा इशारा सुरक्षा यंत्रणे कडून देण्यात आल्याने महत्त्वाची कार्यालये, पक्ष संघटना यांच्या कार्यालयांना टार्गेट करण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पालघरमधील पोलीस सुरक्षा यंत्रणा कार्यरत झाल्या होत्या. मंगळवारी सफाळे भागातील हद्दीतील सोनाली फोंडा पाडा गावच्या हद्दीत आरोपी चिमा बरफ (५६) हा शेतातील एका झोपडीत ठेवलेला शस्त्र साठ्याची साफसफाई करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पालघर दहशतवादी विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक मानिसंग पाटील यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सहाय्यक अधिकारी चंद्रकांत ढाणे, सुनील देशमुख, प्रकाश कदम, हवालदार प्रशांत तुरकर, पोलीस नाईक संतोष निकोळे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, सुभाष आव्हाड, तुषार माळी, शुभम ठाकूर, प्रवीण वाघ, वैशाली कोळेकर, सीमा भोये, आदी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाड घातली.
यावेळी पोलिसांनी तीन गावठी बनावटीचे सिंगल बोर बंदूक, एकवीस जिवंत काडतुसे, शिशाचे मोठे वेगवेगळे छरे, नवीन बंदुका बनवण्यासाठीचे साहित्य असा हजार रु पयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला बुधवारी पालघर न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.