लोखंड चोरीप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:25 IST2020-02-16T23:25:19+5:302020-02-16T23:25:39+5:30
इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सदस्यांचे निवेदन : १६ टन सळ्यांची चोरी

लोखंड चोरीप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी
वाडा : तालुक्यातील खुपरी येथून सोमवारी झालेल्या ट्रेलर अपहरण व लोखंड चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील इंड्रस्टीज असोसिएशनच्या सदस्यांनी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
तालुक्यातील आबिटघर येथे सूर्या ही लोखंडी सळ्यांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीतून नेहमी शेकडो टन लोखंडाची वाहतूक होत असते. सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास एक ट्रेलर सूर्या कंपनीतून सुमारे २० टन लोखंडी सळ्या घेऊन मुंबईकडे रवाना झाला. वाडा-भिवंडी मार्गाने जात असताना रात्री साडेअकराच्या सुमारास खुपरीनजीक चोरट्यांनी कार ट्रेलरसमोर आडवी उभी करून ट्रेलर थांबवला. गाडीतील तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमांनी ट्रेलरचा चालक दीपक शिवप्रसाद व वाहक अभिषेक सिंग यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून खाली उतरवले व त्यांनी आणलेल्या गाडीत डांबून ठेवले. त्यानंतर कारमधीलच अन्य इसमाने ट्रेलर घेऊन पोबारा केला होता.
अज्ञात चोरट्यांनी ट्रेलरच्या चालक व वाहकाला रात्री उशिरा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिल्हार फाटा येथे सोडून दिले होते. तसेच ट्रेलरही वाडा-मनोर मार्गावरील कंचाड येथे टाकून पोबारा केला होता. दरम्यानच्या काळात ट्रेलरमधील सुमारे १६ टन लोखंडी सळ्या लंपास केल्या होत्या. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ७ लाख रु पयांपर्यंत होती. वाड्याच्या इतिहासात प्रथमच असा चोरीचा प्रकार घडल्याने उद्योजक धास्तावले असून स्टील इंड्रस्टीज असोसिएशनने पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करीत परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली. दरम्यान, चोरीचा तपास अंतिम टप्प्यात आला असून लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असे आश्वासन जयकुमार सूर्यवंशी यांनी दिले.