देहरजी प्रकल्प ८० टक्के पूर्ण; २०२७ नंतर भागणार तहान! विक्रमगड तालुक्यात ग्रामीण विकासाला मिळणार चालना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:38 IST2025-05-18T14:38:11+5:302025-05-18T14:38:28+5:30
या प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) व एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार झाला असून एमएमआरडीएने त्यासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे.

देहरजी प्रकल्प ८० टक्के पूर्ण; २०२७ नंतर भागणार तहान! विक्रमगड तालुक्यात ग्रामीण विकासाला मिळणार चालना
मुंबई : पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्पाचे काम आता ८० टक्के पूर्ण झाले असून, २०२७ च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे. त्यातील ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या भागातील जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.
या प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) व एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार झाला असून एमएमआरडीएने त्यासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे. केआयडीसीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केआयडीसीने २७ जुलै २००६ रोजी पीव्हीआर प्रोजेक्ट्स यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आहे. धरणाद्वारे पाणीपुरवठा योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत आहे.
या क्षेत्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी सूर्या प्रकल्पासोबतच देहरजी मध्यम प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होऊन या भागातील सामाजिक-आर्थिक वाढीला मदत होईल.
डॉ. संजय मुखर्जी,
महानगर आयुक्त, एमएमआरडीए
कोणाला किती पाणी ?
वसई-विरार महापालिकेसाठी
१९० एमएलडी पाणी राखीव
पाणीपुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी १५ एमएलडी पाणी
सिडको पालघर क्षेत्रासाठी ५० एमएलडी
पाणी वापराची क्षेत्रे - वसई-विरार महानगरपालिका, सिडको, पालघर जिल्हा परिषद.