जव्हारमध्ये २०० बेडच्या कोविड सेंटरचे लोकार्पण; शाळेच्या इमारतीत सुसज्ज नवीन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:19 IST2021-04-29T23:19:22+5:302021-04-29T23:19:36+5:30
शाळेच्या इमारतीत सुसज्ज नवीन केंद्र

जव्हारमध्ये २०० बेडच्या कोविड सेंटरचे लोकार्पण; शाळेच्या इमारतीत सुसज्ज नवीन केंद्र
जव्हार : जव्हार शहराला लागून असलेल्या जांभुळविहीर परिसरात युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम शाळेच्या इमारतीत कोविड केअर सेंटर उभारले आहे. केंद्र २ चे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, राजेश पारधे पाणीपुरवठा विभाग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील, आदी उपस्थित होते.
पहिले कोविड सेंटर पूर्ण भरल्यामुळे नवीन सेंटरची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका प्रशासनाने सर्व बाबी पडताळून या ठिकाणी नवीन सेंटरची उभारणी केली. जव्हार, मोखाडा तालुक्यांत दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. सरकारी व खासगी रुग्णालयातील बेड अपुरे पडू लागले आहेत. म्हणून जव्हारमध्ये युनिव्हर्सल शाळेच्या इमारतीत २०० बेडचे केंद्र सुरू केले आहे.
उद्घाटनाच्या दिवशी या केंद्रात ८ रुग्णांना दाखल करून उपचारही सुरू करण्यात आले. नवीन केंद्रामुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. खेडोपाड्यांतून झपाट्याने पसरलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ते, परिचारिका, ग्रामसेवक, शिक्षक, सरपंच मेहनत घेत आहेत.