वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर आढळला 250 किलो वजनाचा मृत डॉल्फिन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 15:24 IST2021-06-20T15:23:42+5:302021-06-20T15:24:22+5:30
Vasai : रविवारी सकाळी वसई पश्चिम पट्ट्यातील राजोडी समुद्रकिनारी सकाळच्या सुमारास सात फूट लांबीचा आणि 250 किलो वजन असलेला एक डॉल्फिन मासा गावकऱ्यांना मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती राजोडी ग्रामस्थांनी दिली.

वसईच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर आढळला 250 किलो वजनाचा मृत डॉल्फिन!
- आशिष राणे
वसई : वसई तालुक्याला बऱ्यापैकी गोव्या सारखे नयनरम्य समुद्रकिनारे लाभले असून याच समुद्रात तेल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच या समुद्रातील डॉल्फिन मासे मृत होत असल्याचे अनेकदा आढळून आले असून आजवर चार वर्षांत त्याची संख्या आता जवळपास 50 हून अधिक वर गेली आहे.
पुन्हा एकदा रविवारी सकाळी वसई पश्चिम पट्ट्यातील राजोडी समुद्रकिनारी सकाळच्या सुमारास सात फूट लांबीचा आणि 250 किलो वजन असलेला एक डॉल्फिन मासा गावकऱ्यांना मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती राजोडी ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, मागील वर्षीच वसईच्या कळंबच्या समुद्र किनारपट्टीवर ग्रामस्थांना असाच एक डॉल्फिन जातीचा महाकाय मासा मृत अवस्थेत आढळला होता. मात्र आता पुन्हा वर्षभरात सकाळी भरती वेळी राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावर मृत आणि काळा व लाल पडलेला एक मृत डॉल्फिन मासा आढळून आल्याने पुन्हा या मृत डॉल्फिन माश्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे,
रविवारी आढळून आलेल्या या डॉल्फिन मासाची लांबी तब्बल 7 फूट इतकी मोजली गेली असून या अगोदर आढळलेल्या डॉल्फिनची लांबी साधा चार ते सहा फूट इतकी होती. इतकंच नाही तर आता या मृत डॉल्फिनच्या घटनने वसई तालुक्यातील या विविध समुद्र किनाऱ्यावर आजवर मृत पावलेल्या डॉल्फिनची संख्या आता साधारणपणे 50 हून अधिक वर गेली आहे. या डॉल्फिन माशाला कदाचित कोणा बड्या जहाजाचा धक्का बसला असावा असा प्राथमिक अंदाज आहे तर या माशाला जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथेच किनाऱ्यावर मातीत पुरले.
एकूणच समुद्रातील प्रदूषण, तेल कंपन्यांचे सर्वेक्षण, सोबत समुद्रातील सुरुंग स्फोट आणि त्यात ओएनजीसीच्या साईस्मिक सर्वेमुळेच हे मृत डॉल्फिन सतत आढळत आहेत.ही बाब अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी असल्याचे मत राजोडी ग्रामस्थांनी व मच्छिमार बांधवांनी 'लोकमत'ला सांगितले.