A crowd erupts at the Corona hotspot in Bhayander | भाईंदरमधील कोरोना हॉटस्पॉटमध्ये गर्दीच गर्दी, पोलिसांनी केली कारवाई 

भाईंदरमधील कोरोना हॉटस्पॉटमध्ये गर्दीच गर्दी, पोलिसांनी केली कारवाई 

ठळक मुद्देस्थानिक रहिवाशी असलेले पुनीत पाटील म्हणाले कि , राम मंदिर मार्ग हा गावातील जुना व अरुंद असा रस्ता असताना महापालिका आणि नगरसेवकांच्या गलथानपणा मुळे फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना रुग्णांची जास्त संख्या असलेल्या भाईंदर पश्चिमेच्या राम मंदिर मार्ग परिसराला हॉटस्पॉट घोषित केलेले असताना आज सोमवारी ह्या ठिकाणी फेरीवाल्यांसह खरेदीसाठी लोकांची प्रचंड झुंबड उडाली होती . रहिवाश्यांनी अनेक तक्रारी केल्या नंतर पालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जास्त संख्येने कोरोना रुग्ण सापडलेला भाईंदर पश्चिमेचा राम मंदिर मार्ग परिसर हा ११ ते २४ एप्रिल पर्यंत हॉटस्पॉट जाहीर केलेला आहे. ह्या परिसरातील दुकानदार , फेरीवाल्यांना सुद्धा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत . तसे असताना आज सोमवारी सकाळ पासूनच फेरीवाले आणि काही दुकानदारांनी आपले बस्तान मांडल्याने खरेदीसाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. 

कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडले असताना या हॉटस्पॉट परिसरात पालिकेने फलक लावून सुद्धा व्यवसाय सुरु करून लोकांची प्रचंड गर्दी गोळा झाल्याने स्थानिक रहिवाशी संतप्त झाले . त्यांनी महापालिका व पोलिसांना तक्रारी सुरु केल्या . समाज माध्यमांवर सुद्धा छायाचित्रे पाठवून दाद मागितली . त्या नंतर पालिकेचे प्रभाग अधिकारी आणि भाईंदर पोलीस सक्रिय झाले . पोलीस आणि पालिका पथकांनी बसलेल्या फेरीवाल्यांना हुसकावून लावत काही सुरु असलेली दुकाने बंद करायला लावली. 

स्थानिक रहिवाशी असलेले पुनीत पाटील म्हणाले कि , राम मंदिर मार्ग हा गावातील जुना व अरुंद असा रस्ता असताना महापालिका आणि नगरसेवकांच्या गलथानपणा मुळे फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे. येथे प्रचंड गर्दी होऊन रहिवाश्याना स्वतःचे वाहन नेणे तर सोडा चालणे सुद्धा अशक्य होते . आपत्कालीन वेळी रुग्णवाहिका,  अग्निशामक वाहन सुद्धा जाऊन शकत नाही . अंत्ययात्रा सुद्धा ह्या फेरीवाल्यां मुळे येथून नेता येत नाही अशी बिकट स्थिती आहे . आम्ही रहिवाश्यांनी सातत्याने तक्रारी करून सुद्धा ठोस कारवाई पालिका करत नाही . 

रहिवाशी प्रमोद देठे म्हणाले कि , फेरीवाल्यां कडून बाजार शुल्क वसुली ठेकेदार घेतो शिवाय काहींना हप्ता असावा म्हणून पालिका कारवाई करत नाही. ह्या फेरीवाले आणि होणाऱ्या गर्दी मुळे आमच्या भागात कोरोनाचा संसर्ग व कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत . पालिका आणि पोलिसांनी फेरीवाल्यांना येथून हटवले नाही तर लोकांना आंदोलन करावे लागेल . 

Web Title: A crowd erupts at the Corona hotspot in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.