वसई किल्ल्यात चित्रीकरण करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा; पुरातन शिलालेख असलेल्या दगडांवर पेटवली चूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:42 IST2025-12-22T11:42:02+5:302025-12-22T11:42:11+5:30
संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.

वसई किल्ल्यात चित्रीकरण करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा; पुरातन शिलालेख असलेल्या दगडांवर पेटवली चूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : ऐतिहासिक वसई किल्ल्यातील फ्रान्सिसन चर्च येथे पुरातत्व विभागाच्या आवश्यक नियमावली न पाळता चित्रीकरण केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी कंपनीविरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, १८ व १९ डिसेंबरला मालाड येथील आरंभ इंटरटेनमेंट या खासगी कंपनीमार्फत वसई किल्ल्यातील पुरातन फ्रान्सिस्कन चर्च येथे चित्रीकरण सुरू होते. चित्रीकरणादरम्यान, पुरातन शिलालेख असलेल्या दगडांवर चूल पेटवून पुरातत्व अधिनियमांचा भंग केल्याची तक्रार वसई पुरातत्व विभागाने पोलिस ठाण्यात दाखल केली.
त्यानुसार संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.
चुकीच्या धोरणांमुळे नियमांचे पालन नाही
फ्रान्सिसन चर्चच्या डाव्या बाजूस जिथे चित्रीकरण करण्यात आले, ती जागा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. पोर्तुगीज व मराठा यांच्या युद्धानंतर प्रसिद्ध ठरलेल्या तहाची बोलणी या जागी करण्यात आली.
त्यामुळे इतिहास संशोधक या जागेचा आजही अभ्यास करीत असतात. पुरातत्त्व विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे या जागेवर आवश्यक नियमावलींचे पालन केले जात नाही.
शुल्क मिळत असल्याने केले जाते दुर्लक्ष
पुरातत्त्व विभागामार्फत चित्रीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापोटी या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करतात. तसेच चित्रीकरणादरम्यान सुरक्षारक्षक संबंधित खासगी कंपनींना सूचना देत नाहीत. परिणामी संपूर्ण किल्ल्यातील ऐतिहासिक अवशेष नष्ट झाले आहेत. किल्ले वसई मोहीम परिवार व काही दक्ष नागरिकांनी पुरातत्त्व विभागाला यावेळी कानउघडणी केल्यामुळे संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.