शिपिंग व्यावसायिकाची करोडोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:25 IST2019-03-01T23:25:22+5:302019-03-01T23:25:27+5:30
खोटी कागदपत्रे बनवून जमीन विकली

शिपिंग व्यावसायिकाची करोडोंची फसवणूक
नालासोपारा : मुंबईच्या पवई विभागात राहणाऱ्या शिपिंग व्यवसायिकाची व त्याच्या भागीदाराची नायगाव परिसरातील जमीनीची खोटी कागदपत्रे देऊन करोडो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी वालीव पोलिसांनी चारही आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
मुंबईच्या पवई विभागात राहणारे सोमण अंबाडत हरिदास (54) हे शिपिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी व सन २०१५ साली भागीदार डेल अँन्थोनी रॅली यांनी वसईच्या नायगाव विभागातील सर्व्हे नंबर २८८ मध्ये ३७ गुंठे व सर्व्हे नंबर ३०७ मध्ये १८ गुंठे जमीन मीरारोड परिसरातील बिल्डर आरोपी नसीर खान यांच्याकडून ४ करोड ३० लाख रुपयांना विकत घेतली होती. डिसेंबर महिन्यात जमिनीचा ताबा घेण्यासाठी हरिदास आणि त्यांचे भागीदार रॅली हे गेले असता जमिनीच्या मूळ मालकांनी त्यांना मज्जाव करून आम्ही ही जमीन कोणाला विकली नसल्याचे सांगितले. त्यावेळी हरिदास यांना पाणी कुठे तरी मुरतेय असे वाटल्यावर चौकशी केली असता ती जमिन नसीर खान यांना विकलेली नसल्याचे उघड झाले असून जमिनीची फक्त जनरल पॉवर आॅफ अॅटर्नी बनवून खोट्या सह्या केलेले दस्तावेज सापडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वालीव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी नसीर खान याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी नसीर खान, दयाशंकर तिवारी, सैफुद्दीन हबीबउल्ला आणि वैशाली दुधवाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
याआधी नसीर खान यांच्याकडून स्वस्तात दुकाने विकत घेतली होती. नंतर ३ प्लॉट विकत घेतले होते. १ प्लॉट बरोबर असून बाकीच्या दोन्ही प्लॉटचे बनावट पेपर बनवून ४ करोड ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दोन्ही प्लॉटच्या रजिस्ट्रेशनकरिता ३६ लाख रुपये सुद्धा दिले होते. याने अनेकांना फसवले.
- सोमण हरिदास, तक्रारदार
मुंबईच्या व्यवसायिकांची जमिनीच्या नावावर आर्थिक फसवणूक झाली म्हणून गुरु वारी रात्री चारही आरोपी विरोधात गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात दाखल केला असून तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल.
- उमेश पाटील, तपास अधिकारी व सहायक पोलिस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे