नगरसेवक, अधिकाऱ्यांवर नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 31, 2017 03:34 IST2017-01-31T03:34:10+5:302017-01-31T03:34:10+5:30

सिडकोची बोगस कागदपत्रे तयार करून अनधिकृत बांधकाम करून फसवणुक केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह दोन

Corporators, officers have been booked in the Cemetery | नगरसेवक, अधिकाऱ्यांवर नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल

नगरसेवक, अधिकाऱ्यांवर नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल

वसई : सिडकोची बोगस कागदपत्रे तयार करून अनधिकृत बांधकाम करून फसवणुक केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह दोन सहाय्यक आयुक्त, दोन अधिकारी, तीन बिल्डर, दोन बडे आर्किटेक्ट यांच्यासह तब्बल दहा जणांविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने वसईत खळबळ उडाली आहे.
बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निलेश देशमुख यांनी नालासोपारा येथे सिडकोची बोगस सीसी तयार करून बेकायदा बांधकाम केले असून त्याला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी साथ दिल्याची तक्रार शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी सहा महिन्यांपूर्वी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांनी याप्रकरणी चौकशी केल्यानंतर सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवक देशमुख यांच्यासह दहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नगरसेवक देशमुख यांच्यासह त्यांच्या भागिदारांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सिडकोची बनावट सीसी तयार करून फसवणुक केली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर दोन्ही आर्किटेक्ट यांनी जबाबदार असताना महापालिकेकडे याप्रकरणाची तक्रार न करता याप्रकरणात सामील झाल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या तपासात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे बोगस सीसी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हा पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याआधीचे बोगस सीसीचे गुन्हे महापालिकेमार्फत नोंदवण्यात आले होते.
तपास पूर्ण झाल्यानंतर होनराव यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Corporators, officers have been booked in the Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.