Coronavirus: कोरोनाबाधेवर मात केलेले म्हणताहेत, डर के आगे जीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 23:15 IST2021-04-25T23:14:59+5:302021-04-25T23:15:07+5:30
डाॅक्टरांचा न घाबरण्याचा सल्ला : अन्य आजारांकडे लक्ष देण्याची गरज

Coronavirus: कोरोनाबाधेवर मात केलेले म्हणताहेत, डर के आगे जीत!
सुनील घरत
पारोळ : वसई तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, हा चिंतेचा विषय असून, कोरोनाबद्दलची भीती हेही काही रुग्णांच्या बाबतीत मृत्यूचे कारण ठरत आहे. कोरोनाबाबत असणारी भीती, त्यामुळे येणारे दडपण, यामुळे उपचारासाठी होणारा उशीर तसेच काही रुग्णांना असणारे दुर्धर आजार यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान, डर के आगे जीत है, कोरोना बरा होतो, हेही बाधित होऊन बरे झालेल्या अनेक नागरिकांनी दाखवून दिले आहे.
कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा या आजाराचा सामना करण्याची आज रुग्णांना गरज आहे. यासाठी आरोग्य विभाग व सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. दरम्यान, वसई तालुक्याच्या शहरी भागात ३७ हजार ७१२ आणि ग्रामीण भागात १ हजार ४३४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. जर कोरोनाचा आपण धीटपणे सामना केला तर विजय आपलाच आहे, असे कोरोनामुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
आज वसई तालुक्यात कोरोना झाल्यानंतर त्यातून हजारो रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाबाबत सरकारी व खासगी यंत्रणा अधिक गंभीर असून, रुग्णाच्या उपचारात कुठलीही कसर सोडली जात नाही; पण उपचारासाठी रुग्णही मानसिकदृष्ट्या समक्ष असला पाहिजे. रुग्णांनी या आजाराची भीती बाळगली नाही तर या आजारातून लवकर बरे होतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाची भीती हे कोरोना रुग्णाचे मृत्यूचे मोठे कारण मानले जात आहे. आपल्याला कोरोना झालाय याची प्रचंड भीती रुग्णाच्या मनात असते. त्यामुळे जगण्याचे मानसिक बळ कमी होत आहे. कोरोनाबद्दलच्या भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनाची भीती व मानसिक दडपण हे कोरोना उपचारात बाधा ठरत असले तरी आज कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांची संख्या मोठी असून, भीती नसेल तर कोरोनावर विजय निश्चित आहे.