वसई विरार शहरात कोरोनाचा कहर, 12 दिवसांत 6,504 नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 22:35 IST2021-04-12T22:34:44+5:302021-04-12T22:35:19+5:30
20 जणांचा मृत्यू तर अवघे 2 हजार 422 रुग्ण मुक्त, रुग्णदरवाढीचा दर वाढतोय ; परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वाव

वसई विरार शहरात कोरोनाचा कहर, 12 दिवसांत 6,504 नवीन रुग्ण
वसई - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वसई-विरार शहरातील कोरोनाचा कहर अधिक गडद बनू लागला आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात होताच रुग्णवाढीचा वेग चार ते पाच पटीनं वाढला आहे. सोमवार दि.12 एप्रिल रोजी वसईत 492 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दि 1 एप्रिल ते 12 एप्रिल अशा अवघ्या 12 दिवसांत तब्बल 6 हजार 504 नवीन करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर या 12 दिवसांत 20 जणांचा मृत्यू झाला आहे तसेच केवळ 2 हजार 422 रुग्ण आजवर मुक्त झाले आहेत.
वसई-विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरू लागला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराची चिंता अधिक वाढू लागली आहे. दरम्यान मार्च महिन्यात दिवसाला सरासरी 100 रुग्ण आढळून येत होते. परंतु एप्रिल महिन्याची सुरुवात आणि दुसरा आठवडा सुरू होताच दिवसाला सरासरी आता 400 ते 500 रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. वसईत दि 12 एप्रिल ला सोमवारी पालिकेच्या हद्दीत 492 नवीन रुग्ण आढळून तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 314रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सध्या वसई-विरार शहरातील दि 12 एप्रिल पर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 39 हजार 675 झाली आहे. कोरोना मुक्तांची संख्या 32 हजार 773 झाली आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत 934 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या द्सऱ्या लाटेत सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत शहरात 5 हजार 968 इतकी संख्या झाली आहे.