बालिकेवर उपचारास नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तक्रार
By Admin | Updated: March 23, 2017 01:16 IST2017-03-23T01:16:07+5:302017-03-23T01:16:07+5:30
न्यूमोनियाची रुग्ण असलेल्या दीड वर्षांच्या बालिकेवर सायंकाळी ६ नंतर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली

बालिकेवर उपचारास नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तक्रार
बोर्डी : न्यूमोनियाची रुग्ण असलेल्या दीड वर्षांच्या बालिकेवर सायंकाळी ६ नंतर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी आणखीही अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तिवली जात आहेत.
डहाणू तालुक्यातील नरपड या गावात राहणारी प्रचिती प्रतिक पाटील ही महिला तिच्या स्पृहा या दीडवर्षीय मुलीला घेऊन डहाणू शहरातील बालरोगतज्ञ डॉ. गणपत शानबाग यांच्या विवेक क्लिनिक येथे २० मार्च रोजी गेली होती. त्या वेळी सायंकाळचे सहा वाजून दहा मिनिटे झाली होती. त्या वेळी रुग्णालयात तीन रुग्ण उपचारासाठी थांबले होते. स्पृहाचे नाव नोंदविण्यासाठी गेल्यानंतर तपासणीची वेळ संपल्याची सबब पुढे करून डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. व तिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता घेऊन येण्याचा सल्ला दिला. ती तापाने फणफणत असल्याने नातेवाईकांनी व आपण हात जोडून उपचार करण्याची डॉक्टरांना विनंती केली तरी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नाही. शेवटी तिला अन्य खाजगी रुग्णालयात घेऊन गेली. तेथे तिला न्यूमोनिया झाला असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.