Comfortable! Success in controlling corona virus again in 6 talukas of Palghar | दिलासादायक! पालघरच्या ६ तालुक्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात पुन्हा यश 

दिलासादायक! पालघरच्या ६ तालुक्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात पुन्हा यश 

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये मध्यंतरीच्या काळात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. जिल्ह्यात आजवर ४२ हजार ८६४ लोक कोरोनाबाधित आढळल्याने आणि त्यातील एक हजार १५७ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवाळीआधी नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा दिवाळीनंतर मात्र पुन्हा प्रादुर्भाव वाढला होता. परंतु मंगळवारी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. यामुळे दिलासा मिळाला आहे.

पालघरमध्ये सर्वाधिक रुग्ण वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये आढळले आहेत. यानंतर पालघर तालुक्यामधील रुग्णांची संख्या जास्त आहे. वसई-विरारमध्ये २८ हजार १५४ रुग्ण आढळले आहेत, तर पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ८५८, डहाणूमध्ये २ हजार ०२२, वाडामध्ये १ हजार ८१३, जव्हारमध्ये ५८२, मोखाडामध्ये २८२, तलासरीमध्ये २५५, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३५५, विक्रमगडमध्ये ५७४ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळली असली तरी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या वसई-विरारमध्ये २६ हजारहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ६००, डहाणू तालुक्यामध्ये १ हजार ९४६, जव्हार तालुक्यामध्ये ५६९, मोखाडा तालुक्यामध्ये २७६, तलासरी तालुक्यामध्ये २५१, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३०५, विक्रमगड तालुक्यामध्ये ५६२ तर वाडा तालुक्यामध्ये १ हजार ७६५ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सध्या दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. डहाणूमध्ये ३७, जव्हारमध्ये ८, मोखाडामध्ये १, पालघरमध्ये १११, वसई ग्रामीणमध्ये १, विक्रमगडमध्ये ४, वाडामध्ये ९ रुग्ण उपचार घेत आहेत. वसई-विरार महापालिका हद्दीतील रुग्णांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यांमध्ये सध्या १७१ रुग्णच उपचार घेत आहेत. 

प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे उत्तम नियोजन 
पालघर जिल्ह्यामध्ये वसई आणि पालघर या दोनच तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभरात नवीन रुग्ण आढळून आले. पालघर तालुक्यात पाच तर वसईमध्ये ३१ नवीन रुग्ण आढळले. यात वसईमध्ये तीन, नालासोपारामध्ये ११ तर विरारमध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता सध्या वसई-विरारमध्येच सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र तेथील यंत्रणेनेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले असून सध्या फक्त ५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्धपणे राबविलेल्या मोहिमेमुळेच हे यश मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Web Title: Comfortable! Success in controlling corona virus again in 6 talukas of Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.