कोसबाड येथे नारळ मित्र कार्यशाळा

By Admin | Updated: January 30, 2017 01:27 IST2017-01-30T01:27:48+5:302017-01-30T01:27:48+5:30

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नारळ मित्र कार्यशाळेचे आयोजन कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते.

Coconut Friends Workshop at Kosbad | कोसबाड येथे नारळ मित्र कार्यशाळा

कोसबाड येथे नारळ मित्र कार्यशाळा

अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नारळ मित्र कार्यशाळेचे आयोजन कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. या वेळी नारळ पिकावरील रोग तसेच शिडीद्वारे झाडावरून फळं काढणी यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, नारळ बोर्डाचे प्रक्षेत्र अधिकारी शरद आगलावे यांनी मार्गदर्शन केले.
पालघर जिल्हयातील जमीन, हवामान व पाणी नारळ पिका करिता पोषक असल्याने १९७० हेक्टर क्षेत्रावर वेस्ट कोस्टल टॉल या जातींची लागवड करण्यात आली आहे. या झाडांपासून प्रतीहेक्टर सुमारे ५८ लक्ष फळं मिळतात. विशेषत: किनारी भागात हे प्रमाण अधिक आहे. काही वर्षांपासून एरियोफाइल्ड माईट (अष्टपाद कोळी) या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नारळाच्या झाडांची स्वच्छता ठेवल्यास अनेक रोगांचा संसर्ग टाळता येऊ शकतो. मजुरांची घटती संख्या आणि मजुरीचे वाढते दर ही बागायदारांसाठी मोठी समस्या आहे.
शिवाय उंच झाडांवर चढणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. त्यामुळे या क्षेत्रात यांत्रिकीकरण आवश्यक बनले आहे. त्यामुळे नारळ विकास बोर्ड आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्र यांनी संयुक्तपणे नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन २३ ते २८ जानेवारी या काळात केले होते. या वेळी नारळ लागवड, पाणी व खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, आदि माहिती देण्यात आली.
या शिवाय शिडीद्वारे नारळाच्या झाडावर चढून फळे काढणी, झाडाची स्वच्छता आदि प्रात्यक्षिके नारळ विकास बोर्डाचे रूपेश तांबडे व दर्शना खोत यांनी शेतकऱ्यांना दाखविले. माहीम येथील प्रगतिशील शेतकरी अनंत राऊत यांच्या नारळ बागेतील सराव सत्रात विशेषत: महिला शेतकऱ्यांनीही १५ ते २० फुट उंच झाडावर चढाई केली. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी कुमारवेल यांच्या हस्ते वीस प्रशिक्षणार्थींना झाडावर चढण्याची शिडी, मार्गदर्शन पुस्तिका तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील विलास जाधव, अनुजा दिवटे, भरत कुशारे, उत्तम सहाणे, अशोक भोईर आदि शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Coconut Friends Workshop at Kosbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.