Billions of Rupees money spent for tourism go Wasted | पर्यटनासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी जातो आहे फुकट, जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी
पर्यटनासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी जातो आहे फुकट, जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यातील किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सुंदर केलेले समुद्र किनारे स्थानिक लोकांच्या समुद्रकिनाºयावर शौचाला बसण्याने अस्वच्छ होत आहेत. शासनाचा पर्यटन वाढीच्या उद्देशाना यामुळे खीळ बसते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या या असल्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी जिल्हा योजना ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाच्या मंजूर कामासाठी २०१६-१७ व १७-१८ सालासाठी एकूण १ हजार ६८९ कोटी ६७ लाख रु पयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यातील निव्वळ २२० कोटी ६८ लाखांचा निधी हा किनारपट्टीवरील निर्मळ-कळंब, झाई, केळवे, डहाणू, एडवन, आशापुरा, पाणजू बेट आदी किनारपट्टीवरील गावांतील पर्यटनाच्या विकासासाठी देण्यात आला असून त्या दृष्टीने कामेही सुरू करण्यात आली आहेत.

पर्यटन स्थळाची सुधारणा करणे, संरक्षक भिंत बांधणे, रस्ते तयार करणे, स्वच्छतागृहांची उभारणी करणे, पर्यटन स्थळाचे सुशोभीकरण करणे, पेव्हरब्लॉक बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पथदिवे बसविणे, सौर दिवे बसविणे, पार्किंग व्यवस्था, वाहन तळ उभारणे, बहुउद्देशीय हॉल उभारणे, चेंजिंग रूम तयार करणे, बाग विकसित करणे अशाप्रकारच्या सोयीसुविधा पर्यटकांसाठी उभारल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढेल. त्या अनुषंगाने जिल्ह्यात रोजगाराची संधी निर्माण होऊन स्थानिकांना गावातच रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे प्रयत्नशील आहेत.

जिल्ह्याला ११० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून अत्यंत सुंदर, स्वच्छ, विविध जैवविविधता असलेला भूभाग लाभल्याने मुंबई, गुजरात आदी भागातील पर्यटक कळंब, अर्नाळा, शिरगाव, सातपाटी, डहाणू भागातील समुद्र किनाºयांना पसंती देऊ लागला आहे. शिरगाव-सातपाटी-वडराई हा १०-१२ किमी.चा समुद्रकिनारा आणि नारळी-पोफळीने बहरलेला असा निसर्गसंपन्न असलेला हा भाग आता पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. त्यामुळे सातपाटीमधील सुप्रसिद्ध ताजे पापलेट, दाढा, सुरमई, रावस तर वडराईमधील बोंबील, कोळंबी तर शिरगावमधील सकस ताडी, केळी, शुद्ध भाजीपाला यांमुळे एक दिवसाच्या पिकनिकसाठी पर्यटकांची पावले आता येथे वळू लागली आहेत. त्यातच चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेला समुद्र किनाºयावरील किल्लाही मुलांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिरगाव-वडराईच्या मध्यभागी पश्चिमेकडील समुद्र किनारी असलेला भूभाग हा स्कूबा डायव्हिंगसाठी योग्य असून येथे स्टार फिश, आॅक्टोपस, लहान - मोठे रंगी बेरंगी मासे, विविध शंख-शिंपले, सिगल पक्षी यांची चांगली संख्या दिसते. त्यामुळे मुंबईमधील अनेक कुटुंबीय, पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी या भागाला भेटी देत निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेत आहेत.

अशा निसर्ग संपन्न भागाचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि त्यांची टीम सातत्याने झटत असताना शिरगाव, सातपाटीसह किनारपट्टीवरील अनेक गावातील काही स्थानिक समुद्रावरच शौचाला बसत असल्याने जिल्हाधिकाºयांनी नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या भागात निसर्गाची लयलूट असल्याने हा भाग स्वच्छ तसेच सुंदर असताना काही विघ्नसंतोषी लोक उघड्यावर शौचाला बसून असंवेदनशीलतेचे दर्शन घडवीत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रवृत्तीमुळे समुद्र किनाºयावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते आहे.

गावे केवळ कागदोपत्रीच हागणदारीमुक्त
पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी सर्व गावे ही हागणदारीमुक्त असल्याचे घोषित केली असले तरी हे फक्त कागदोपत्री झाल्याचे दिसून येत आहे. ही गावे हागणदारीमुक्त झाल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर करीत आपली पाठ थोपवून घेण्याचे काम केले आहे.

मात्र प्रत्यक्षात ही गावे हागणदारी मुक्त झालीच नसल्याचे दिसून येत आहे. हे रोखण्याचे काम संबंधित ग्रामपंचायतीचे, ग्रामसेवकांचे असतानाही त्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या स्वच्छतेच्या व हागणदारीमुक्त योजनेचे बारा वाजल्याचे निदर्शनास येत आहे.

इतके सुंदर व स्वच्छ समुद्र किनारे इथे असल्याने आम्ही पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील असताना काही स्थानिक नागरिक समुद्रावर उघड्यावर शौचाला बसतात, हे योग्य नाही. लोकांनी संवेदनशीलपणे याचा विचार करून तत्काळ या गोष्टी बंद करायला हव्यात.
- डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी

Web Title: Billions of Rupees money spent for tourism go Wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.