भिवंडी - वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:44 AM2019-09-15T00:44:44+5:302019-09-15T00:44:52+5:30

वाडा - भिवंडी महामार्गावरील वाडा ते भिवंडी दरम्यानचा रस्ता जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी उखडला आहे.

Bhiwandi - Only pits left on Wada highway | भिवंडी - वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच

भिवंडी - वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच

googlenewsNext

वाडा : वाडा - भिवंडी महामार्गावरील वाडा ते भिवंडी दरम्यानचा रस्ता जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी उखडला आहे. त्यामुळे रस्ता आहे की खड्डा हे कळणेही मुश्किल झाले आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने चालकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. खड्ड्यात पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये - जा करतात. सद्यस्थितीत या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे अग्निदिव्य झाले आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनांच्या येण्याने नागरिकांच्या अंगावर चिखल उडत असल्याने येथून पायी प्रवास करणे कठीण झाले आहे. या मार्गावरून जाताना चांगलेच धक्के बसतात, त्यामुळे अनेकांना कंबरदुखी, पाठदुखीसारखे त्रास होत आहेत. त्यातच खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे.
वाडा-भिवंडी- मनोर हा रस्ता बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सरकारने सुप्रीम कंपनीला दिला आहे. पाच वर्षांपूर्वीच हा रस्ता बनवला होता. मात्र काम निकृष्ट दर्जाचे केल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यासाठी टोल आकारला जात असताना रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
मात्र सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तत्काळ करावे, अशी मागणी चालकांसह प्रवासी करीत आहेत. यासंदर्भात सुप्रीम कंपनीचे अधिकारी झेड.एन.शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
>सहा महिन्यांत रस्ता सुस्थितीत होणार
भिवंडी - वाडा - मनोर या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी विक्र मगड येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कंपनीला सहा महिन्यात रस्ता सुस्थितीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र आतापर्यंत कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली दिसत नाही.
>दुचाकीस्वाराचा मृत्यू
भिवंडी - वाडा महामार्गावरील वारेट येथे दोनच दिवसांपूर्वी खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यात दुचाकी पडली. आणि मागून येणाऱ्या ट्रकचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून जाऊन त्याचा मृत्यू झाला.
>खड्डे भरण्यासाठी तीन कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून येत्या काही दिवसात ते मंजूर होऊन कामाला लवकरच सुरुवात होईल.
- प्रकाश पातकर,
शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा

Web Title: Bhiwandi - Only pits left on Wada highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.